Narhari Zirwal : 'माझ्या मुलाने काहीही सांगितलं तरी, दादा म्हणजे दादाच'; नरहरी झिरवाळांनी अखेर स्पष्ट केली भूमिका!
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी शरद गटात जाणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. मात्र आता यावर खुद्द नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी मी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे, माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील असे वक्तव्य केले होते. तर नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटाच्या नाशिक येथे झालेल्या बैठकीस गैरहजर राहिल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. झिरवाळ शरद पवार गटात जाणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. मात्र आता यावर खुद्द नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मी कायम दादांच्या सोबत
नरहरी झिरवाळ म्हणाले की, मी कायम दादांच्या सोबत आहे. पहाटेच्या शपथविधीला देखील मी पहिले हजर होतो. मग माझ्या मुलाने देखील काहीही सांगितलं तरी मी फक्त दादा म्हणजे दादाच. या सर्व नेत्यांनी मिळून मला विधानसभा उपाध्यक्ष केलं आहे. यात सरकार चार वेळेस इकडे तिकडे झालं. पण, मी कायम तिथेच आहे. दादांनी ज्या पद्धतीने सहकार्य केले ते मोठं आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून नरहरी झिरवाळ यांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर पूर्णविराम लागले आहे.
अजित दादा मला आदिवासींचं प्रमुख म्हणून बघतात
ते पुढे म्हणाले की, तटकरे साहेब जलसंपदा मंत्री असताना या भागात पाण्याबाबत खूप काम केलं आहे. मी घेतलेला निर्णय हा तुम्हाला (जनतेला) न विचारता जरी घेतला असेल तरी विकासासाठी घेतलेला निर्णय आहे. अजित दादा मला आदिवासींचं प्रमुख म्हणून बघतात. जर एखाद्या खात्याचा मंत्री झालो असतो तर एकच खात्याचे काम करावं लागलं असतं. पण, मी विधानसभा उपाध्यक्ष झाल्याने सर्व खात्यांचे काम करता येते, असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील आदिवासींसाठी मी मदत मागत आलोय
मी महाराष्ट्रातील आदिवासींसाठी मदत मागत आलो आहे. जिथे लक्ष दिले जाते तिथे कामाच्या गुणवत्तेत फरक पडतो. 9 तारखेला शेवटचे बजेट झाले. आता पुन्हा बजेट होईल, असे वाटत नाही. बहीण भावाच्या पैशांमुळे सर्व सर्व्हर जॅम आहेत. रेशन दुकानदारांना ऑनलाइन रेशन देण्याचे आदेश काढण्यात आले आहे, असे नरहरी झिरवाळ यावेळी म्हणाले.
आणखी वाचा