मराठी लिहिता वाचता येत असेल तरच रिक्षा चालवता येणार, परवान्यासाठी नाशकात RTOचा नवा नियम, नेमकं होणार काय?
रिक्षाचालकांना सरकारी सूचना, मार्गदर्शक तत्त्वे, तसेच प्रवाशांची माहिती समजावी, यासाठी मराठी वाचन-लेखन येणं आवश्यक आहे. अशी आरटीओची भूमिका आहे.

Nashik: नाशिक शहरात रिक्षा चालवायचीय? मग मराठी लिहिता-वाचता आलीच पाहिजे! नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) रिक्षा परवाना मिळवण्यासाठी आता नवीन अट लागू केली असून, मराठी भाषेची मूलभूत परीक्षा पास होणं अनिवार्य केलं आहे. याचा फटका अनेक रिक्षाचालकांना बसू लागला असून, गेल्या आठवड्यात तब्बल 145 अर्जदार अपात्र ठरले आहेत.
रिक्षाचालकांचे अर्ज होताहेत बाद
मराठी भाषेची ही परीक्षा कोणत्याही गुणांच्या आधारावर नाही, परंतु उमेदवाराला मराठी लिहिता वाचता येते की नाही, याची चाचणी घेतली जाते. या निर्णयामुळे दररोज 15 ते २20 रिक्षाचालकांचे अर्ज नाकारले जात आहेत. नाशिकमध्ये अनेक रिक्षाचालक मराठी बोलू शकतात, मात्र त्यांना वाचता आणि लिहिता येत नसल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी अशा भाषिक अटी नव्हत्या, त्यामुळे ही नवी अट अचानक आल्याने रिक्षाचालकांमध्ये नाराजी पसरली आहे.नाशिक आरटीओच्या या नव्या अटीवर रिक्षाचालक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
नेमकं होणार काय?
नाशिकमध्ये आता रिक्षा चालवण्यासाठी फक्त वाहनचालक परवाना असून चालणार नाही, तर उमेदवाराला मराठी भाषा लिहिता-वाचता येणंही आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) अलीकडेच हा नवा नियम लागू केला असून, यामुळे अनेक रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. नवीन नियमांनुसार, परवान्यासाठी अर्ज करताना उमेदवाराची मराठी भाषा चाचणी घेतली जाते. या चाचणीत कोणतेही गुण नसतात, मात्र उमेदवाराला मराठी वाचता व लिहिता येते की नाही, याची प्राथमिक पातळीवर पडताळणी केली जाते. गेल्या आठवड्यात या परीक्षेत अपात्र ठरलेल्या १४५ जणांचे अर्ज RTOने फेटाळले आहेत.
अनेक रिक्षाचालक बोलणारी मराठी उत्तम जाणतात, मात्र शाळेतील शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना लिहिणं किंवा वाचणं अवघड जातं. परिणामी ते या चाचणीत नापास होतात आणि परवान्यापासून वंचित राहतात. या निर्णयावर रिक्षाचालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. RTOने मात्र आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. त्यांच्या मते, रिक्षाचालकांना सरकारी सूचना, मार्गदर्शक तत्त्वे, तसेच प्रवाशांची माहिती समजावी, यासाठी मराठी वाचन-लेखन येणं आवश्यक आहे.
हेही वाचा























