Nashik Leopard Attack : सहा वर्षांची चिमुरडी उंबरा ओलांडत होती, अशातच बिबट्याने झडप घातली, अन्.... त्र्यंबक परिसरातील चौथी घटना
Nashik Leopard Attack : नाशिकमधील त्र्यंबक तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात पिंपळद शिवारात बिबट्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Leopard Attack : नाशिकसह (Nashik) जिल्हाभरात बिबट्याचा (Leopard) वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी त्र्यंबक तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात एका सहा वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच याच परिसरातील पिंपळद शिवारात बिबट्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, चांदवडसह आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे वेळुंजे आणि धुमोडी या शिवारात बिबट्याने लहान मुलांना लक्ष्य केल्याचे समोर आले. अशातच आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरजवळील पिंपळद शिवारात बिबट हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात एका सहा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रगती भाऊसाहेब सकाळे असे या चिमुरडीचे नाव आहे.
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा मुलीवर हल्ला
पिंपळद शिवारात सकाळे वस्ती आहे. या वस्तीत भाऊसाहेब सकाळे यांच्या कुटुंबासह इतर सकाळे कुटुंब वास्तव्यास आहे. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रगती ही घरी असताना शेजारीच असलेल्या चुलत्याच्या घरी जात होती. हे अंतर अवघे एक ते दोन मिनिटांचे. मात्र दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून घरातील सर्व बाहेर आले. यावेळी बिबट्याने धूम ठोकली. मात्र हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी तात्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक वनविभागाचे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे. पिंपळदसह परिसरात ठिकठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर घटना घडूच नये यासाठी वनविभागाने जनजागृती अभियानासह ठोस उपाययोजना करण्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
वर्षभरातील चौथी दुर्दैवी घटना
साधारण वर्षभरापूर्वी त्र्यंबकेश्वर जवळील धुमोडी परिसरात मळ्यात राहणाऱ्या लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे अधोरेखित झाले होते. त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी वेळुंजे परिसरात दारात उभा असलेल्या लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर वेळुंजे परिसराला लागून असलेल्या ब्राह्मणवाडे परिसरात अंगणात खेळत असलेल्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पिंपळद शिवारात झालेल्या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.