(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : गोदावरीच्या किनाऱ्यांवर आता ई-टॉयलेट, प्रदूषण करणाऱ्यांवर होणार कारवाई
Nashik News : नाशिकची (Nashik) गोदावरी (Godawari) प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radha Krushna Game) यांनी दिला आहे.
Nashik News : गोदावरीच्या संवर्धनाबाबत वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र काही कालावधीनंतर परिस्थिती जैसे थे दिसून येते. मात्र आता पुन्हा एकदा प्रशासनाने गोदावरी संवर्धनाचा विडा उचलला असून औद्योगिक वसाहतीतून प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असा इशारा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna game) यांनी दिला आहे.
नाशिकची गोदामाई म्हणून ओळखली जाणारी गोदावरी आजही प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. अनेक वर्षांपासून गोदावरीच्या संवर्धनासाठी नमामि गोदा व इतर प्रकल्पांच्या माध्यमातून संवर्धन करण्याचे काम सुरु आहे. मात्र फलित शून्य असल्याचं वारंवार दिसून येते. अहिल्यादेवी होळकर पूल ते गाडगे महाराज पूल हा भाग सोडला तर त्र्यंबकेश्वर येथील उगमापासून ते पुढे चेहेडी पात्रापर्यंत आजही गोदावरी पानवेली, सफेद फेस, कंपन्यांचे प्रदूषित पाण्याच्या विळख्यात आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात उच्च न्यायालयाच्या (High court) आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या (Godavari Pollution control comity) त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या सांडपाण्याचा शेती व उद्योगांसाठी पुनर्वापर वापर करता येईल का, याचा अभ्यास करुन तसा अहवाल द्यावा. गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली वाढल्या असून त्या कचरा डेपोत कंपोस्ट करण्यासाठी नेण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
....तर दंडात्मक कारवाई
गोदापात्रात कपडे, वाहने, त्याच बरोबर प्राणी धुण्यास प्रतिबंध करुन नियंमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच दशक्रिया व इतर पुजेचे साहित्य गोदापात्रात टाकले जावू नये, निर्माल्य कलशात टाकावे, अशा सूचनांचे जागोजागी फलक लावून त्या खाली नागरिकांनी तक्रारीसाठी संबंधित यंत्रणेचे संपर्क क्रमांकही देण्यात यावेत, असे गमे यांनी सांगितले.
ई-टॉयलेटची व्यवस्था
नाशिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. कोरोनानंतर हजारोच्या संख्येने भाविक भक्त नाशिकमध्ये दाखल होतात. तसेच रामकुंडावर पर्यटक, भाविक मोठ्या प्रमाणावर येताता. गोदापात्राच्या परिसरातील स्वच्छता कायम असावी. तसेच भाविकांच्या सोयीसाठी गोदावरी किनाऱ्यावर सुलभ शौचालया ऐवजी ई-टॉलेटची उभारावे, असेही गमे यांनी यावेळी सांगितले. तसेच रामकुंडावरील वस्त्रातंरणगृह येथे गोदावरी संवर्धन कक्षास जागा उपलब्ध करुन घ्यावी.