Dhangar Reservation : धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
Narhari Zirwal : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ते सोमवारपासून राज्य सरकार विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
नाशिक : राज्यात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) आंदोलन सुरु असताना धनगर आरक्षणावरून (Dhangar Reservation) आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा शब्द दिला आहे. यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन अध्यादेश (GR) काढला तर राज्यातील 60 ते 65 आमदार राजीनामा देतील, असा निर्वाणीचा इशाराही नरहरी झिरवाळ यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
सोमवारपासून नरहरी झिरवाळ यांचे बेमुदत धरणे आंदोलन
यानंतर आता सोमवारपासून मंत्रालयात समोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ नरहरी झिरवाळ हे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी, ही प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीसाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार देखील गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत.
हिरामण खोसकरांना अश्रू अनावर
दरम्यान, आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारने जर आज धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. राज्य सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे आमची मुलं रस्त्यावर येतील. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमच्यामध्ये त्यांना जर आणणार असाल तर आम्ही याला विरोध करणार आहोत. नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रत्येक मतदारसंघात 60 ते 70 हजार ही आदिवासी मतं आहेत. सरकारसाठी आम्ही काही वेगळा निर्णय घेतला तर खूप जड जाईल. धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. जर आंदोलन करून निर्णय शकणार असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करू, असे खोसकर यांनी सांगितले. तर यावेळी हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या