भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळ म्हणाले...
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : 2004 साली छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असे शरद पवार यांनी म्हटले. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
नाशिक : 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळत होते, पण नेतृत्वाने काँग्रेसला दिले, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत मोठा दावा केला. 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असे त्यांनी म्हटले. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, 1995 साली आमचे सरकार गेले. त्यानंतर पवार साहेबांनी मला एमएलसी केले आणि नंतर विरोधी पक्ष नेता केले. त्यावेळी विरोधी पक्ष नेता शिवसेना-भाजप सर्कसच्या म्हणून मी जे काम केले. त्यावेळी माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी मी वन मन आर्मी म्हणून लढलो होतो. त्या काळात काँग्रेस फुटली नसतो तर माझी खात्री आहे की, मुख्यमंत्री मीच झालो असतो.
तेव्हा मी पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला : छगन भुजबळ
पवार साहेबांनी ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर काढले. पक्ष फुटला तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्येच थांबावे, विधानसभेची निवडणूक झाली की, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो, असे निरोप मला देण्यात आले. मात्र मी पवार साहेबांसोबत राहणार असे त्यांना सांगितले. त्यावेळी राष्ट्रवादीची पहिली निवडणूक काही जास्त साधन नसतानाही आम्ही प्रचार केला. त्यावेळी काँग्रेसचा मुख्यमंत्री व मी उपमुख्यमंत्री झालो.
शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2004 साली अजितदादा नवीन होते हे बरोबर आहे. मी आधीपासून पवार साहेबांसोबत होतो. 2004 साली जास्त जागा आल्यावर काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होती. दिल्लीत आम्ही जाऊन बोललो होतो. आम्ही द्यायला तयार होतो. मात्र पवार साहेब नाही म्हणाले, असेही काँग्रेस श्रेष्ठी आम्हाला बोलले. मात्र मला मुख्यमंत्रीपद दिल्यावर पक्ष फुटला असता अस ते का म्हणाले? याबाबत मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
मतदारांनी मोदींच्या पाठीशी राहण्याची गाठ बांधली : छगन भुजबळ
नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येतील. मतदारांनी मोदींच्या पाठीशी राहण्याची गाठ बांधली आहे. माझ्या घराच्या आजूबाजूला देखील कमळ फुलले आहे. त्यामुळे सर्वांनी महायुतीला मतदान करा, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा