Nanded Rain : तीन दिवसानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांपुढं पिकं वाचवण्याचं संकट
गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात तब्बल दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसानं थोडी उसंत घेतली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे उरकून घेण्यास थोडीफार सवड मिळाली होती. गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. या जोरदार पावसामुळं शेतात व रस्त्यावर सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे. या सततच्या पावसामुळं पिकं वाचवण्याचं मोठं संकट शेतकऱ्यांपुढं उभं राहिलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील 36 प्रकल्प तुडुंब
दरम्यान, जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसानं चांगलाच दोर धरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीस झालेला पाऊस इतका बरसला की चार महिन्यामध्ये होणारी पावसाची सरासरी दोनच महिन्यात पूर्ण झाली. ज्यामुळं विष्णुपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील 36 प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मात्र, या पावसामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यानंतर पावसानं उघडीप घेत थोडी उसंत घेतली होती. ज्यामुळं शेतात व पिकांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होईल असे वाटले होते. तर दुसरीकडं प्रशासनाकडून आता कुठे पंचनामे करण्यास सुरुवात झाली होती. ज्यामुळं शेतकऱ्यांना थोडीफार का होईना मदत मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तीन दिवसांची उघडीप झाल्यानंतर रात्रीपासून जिल्हाभरात पुन्हा पावसानं जोर धरला आहे.
रस्त्यावरही पाणी
रात्रीपासून नांदेड जिल्हा आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शहरात पाणीच पाणी झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं आहे. शहरातील रस्त्यावर देखील पाणीच साचलं असून, वाहतुकीवर परिणाम होत आहे. दरम्यान, शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळो, पण पुराच्या पाण्याच्या तडाख्यात वाचलेली ही पिके पुन्हा या पावसाच्या जोरात वाचतील की जातील? हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच, आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना खरबदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: