Nanded: पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची तेलंगणातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
Nanded News: दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पोचमपाड धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले असून, संभाव्य पुराच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
Nanded News: नांदेड जिल्ह्यात व गोदावरीच्या पात्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर ही पाणी पातळी आणखी वाढल्यास शेजारील गावात या पाण्याच्या पुराचा फटका बसू शकतो. गोदावरी नदीवरील बंधारे, सध्या त्यातील पाणीसाठा व येत्या तीन-एक दिवसात होणारी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या पोचमपाड धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तेलंगणातील निर्मला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुशर्रफ फारुकी सुद्धा उपस्थित होते.
विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याची आवक लक्षात घेता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र संभाव्य परिस्थिती लक्षात घेता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोणातून पाटबंधारे विभागाने विष्णुपुरीचे सात दरवाजे उघडले आहेत. या प्रकल्पात दिग्रस बंधारा, पुर्णा नदी व मुक्त पाणलोटातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत आहे. सोडण्यात येणारे हे पाणी बळेगाव, बाभळी प्रकल्पाद्वारे पोचमपाड प्रकल्पात जाते. पोचमपाड प्रकल्पाचे दरवाजे जर बंद ठेवले तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गोदावरीतील पाणीसाठ्यावर होऊन मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा फुगवटा निर्माण होतो. यामुळे स्वाभाविकच नदीकाठचे गावे पाण्याखाली येतात.
पोचमपाड धरणाचेही दरवाजे उघडले...
त्यामुळे पुराचा हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्मल जिल्हाधिकाऱ्यांसह पोचमपाड धरणावर अंतरराज्य पूर समन्वयाबाबतची आढावा बैठक घेऊन नियोजन केले. तेलंगणा पाटबंधारे विभाग व निर्मल जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पोचमपाड धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले असून संभाव्य पुराच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या...