(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मास्कशिवाय VCA स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नाही, रेनकोट, छत्र्या आतमध्ये नेण्यास मनाई
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज VCAच्या स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र पावसाळी वातावरणामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
नागपूरः भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यात आज जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्याची (2nd T20 Match) उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असून ज्यांना सामन्याची तिकीटे मिळाली आहे, त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.
व्हीसीए स्टेडियमच्या (VCA stadium) आतमध्ये प्रवेश करताना फेसमास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच प्रेक्षकांना आतमध्ये काढी असलेला राष्ट्रीय ध्वज, सेल्फी स्टिक्स, कॅमेरे, लायटर, माचिस, सिगारेट, विडी, हेल्मेट, फूट पॅकेट्स, पाणी बॉटल यापैकी कोणतीच वस्तू तसेच इतर ज्वलनशील व संवेदनशील वस्तू नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
रेनकोट, छत्रीही आतमध्ये नको
शिवाय पावसाळी दिवस असले तरीही, प्रेक्षकांना रेनकोट (Rain Coat) व छत्र्यादेखील (umbrellas not allowed) आतमध्ये नेण्याची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे सामन्यादरम्यान पाऊस आल्यास नागरिकांची फजिती होणार आहे, हे निश्चितच. उल्लेखनीय म्हणजे प्रेक्षकांना मास्कशिवाय (No Mask No entry) एंट्रीसुद्धा मिळणार नाही. त्यामुळे वरील वस्तू आणून प्रेक्षकांनी नाहक मनःस्ताप करुन घेऊ नये, असे व्हीसीए व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तसेच स्टेडियमच्या आतमध्ये प्रेक्षकांना फक्त निशुल्क पाणी पुरविण्यात येणार आहे. शिवाय मोफत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
सौरव गांगुली, जय शाह यांची हजेरी?
व्हीसीए स्टेडियमवर आज होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्याला (BCCI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly), सचिव जय शाह (jay shah), कोषाध्यक्ष अरूण धुमाळ यांच्यासह क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. याशिवाय विदर्भ आणि मध्यप्रधेश येथील राजकीय व व्यावसायिक जगतातील मान्यवरही सामन्याचा आनंद घेण्यासाठी नागपुरात पोहोचले असल्याची माहिती आहे.
पावसामुळे कालच्या सरावावर पाणी
यजमान भारत आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांच्या आज विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र पावसाळी वातावरणामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. शहरात गुरुवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे खेळाडूंच्या नियमित सरावावरही पाणी फेरले गेले. ठरलेल्या नियोजनानुसार ऑस्ट्रेलिया संघ दुपारी एक ते चार दरम्यान आणि भारतीय संघ सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सराव करणार होता. मात्र सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने दोन्ही संघ हॉटेलमधून बाहेरच पडले नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या