Nagpur Rain Update: नागपुरात हुडकेश्वर गावातील नाल्याला पूर, 24 तासांपासून अडकलेल्या नागरिकांचं बचावकार्य सुरू, जनजीवन विस्कळीत
Nagpur: शहरातील पिपळा हुडकेश्वर भागात चाळीस घरे पाण्याखाली गेली आहेत. पिपळा नाल्याला पूर आल्याने वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाने हुडकेश्वरमधून आणि वीरव गावातून चार नागरिकांना रेस्क्यू केलंय.

Nagpur Rain Update : नागपूर शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला होता. त्यानुसार नागपुरात आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत तब्बल 172 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला आणि पहाटेपासून मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नागपुरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रामनगर परिसरातील हिल रोड ते पांढरा बोडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा तसेच कॉलेजेसना सुट्टी दिली आहे. कोचिंग सेंटर्सनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दुसरीकडे, शहरातील पिपळा हुडकेश्वर भागात चाळीस घरे पाण्याखाली गेली आहेत. पिपळा नाल्याला पूर आल्याने वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाने हुडकेश्वरमधून आणि वीरव गावातून चार नागरिकांना रेस्क्यू केले आहे. ग्रामीण भागात पाटणसावंगी आणि ब्रह्मपुरी गावांचा संपर्क तुटला आहे. कोलार, वेणा आणि कनाल नद्यांनाही पूर आला आहे.
अग्निशमन विभागाच्या मदतीचा मोठा हात
नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशन विभागाच्या पथकाने हुडकेश्वर भागातील पोहरा नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या नागरिकांना फक्त रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढलं नाही तर पूरग्रस्तांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सुखरूप पोहचून देत आपली कर्तव्य तत्परताही दाखवली आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला या कठीण काळात अग्निशमन विभागाच्या मदतीचा मोठा हात मिळाल्याने पीडित कुटुंब कृतज्ञता व्यक्त करत आहे.
दोन वर्षांपूर्वीचा कटू अनुभव आणि यंदा नागपूरकर सावध!
दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुराचा आणि त्यामध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या आर्थिक नुकसानीचा कटू अनुभव लक्षात घेता यंदा पावसाचे पाणी साचलेल्या अनेक भागांमध्ये नागरिकांनीच खास करून तरुणाईने दक्षता बाळगलीय आणि रात्रीच्या अंधारातच नाल्या आणि सीवर लाईनचे चेंबर खुले केले. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये साचलेला पाणी लवकर निघून जाण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान नागपूर शहराच्या अवतीभवती वसलेल्या वस्त्यांना त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत कडून मदत मिळाली नसल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. पावसाने नागपूरकरांची अडचण केली असली तरी नागपूर आणि नागपूरकर थांबलेले नाही. कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागपूरकरांची गुडघाभर पाण्यातूनही धडपड बघायला मिळाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























