Nagpur : 150 वर्ष जुन्या वडाच्या झाडाला मिळाले नवजीवन, पर्यावरणप्रेमींकडून अभिनंदन
शहरात आलेल्या जोराच्या वादळात गोरेवाडा तलावाजवळील जुने विशाल वडाचे झाड मुळासकट कोलमडून पडले. सुमारे 150 वर्ष जुन्या या झाडाचा घेर 17 फुट एवढा आहे. याच्या पुनर्रोपनाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आला.

नागपूर : मे महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे 150 वर्ष जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे. गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे पुनर्रोपन करण्यात आले असून उद्यान विभागाच्या या कामगिरीबद्दल शहरातील पर्यावरण प्रेमी आणि मनपा आयुक्तांनीही उद्यान विभागाचे अभिनंदन केले आहे.
24 मे रोजी नागपूर शहरात जोराचे वादळ आले. या वादळामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. मात्र यासोबतच मंगळवारी झोन मधील गोरेवाडा तलावाजवळील क्वाटर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट कोलमडून पडले. सुमारे 150 वर्ष जुन्या या झाडाचा घेर 17 फुट एवढा आहे. या झाडाच्या पुनर्रोपनाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आला. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार व त्यांच्या चमूने झाडाच्या पुनर्रोपनाचे आव्हान स्वीकारले.
क्रेन न वापरता पुनर्रोपन
उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर 20 फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने 25 फुट रुंद आणि 12 फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी पुनर्रोपन करून ते पुढे जगावे यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले. झाडाच्या फांद्या कापताना झाडाचा तोल हळुहळू खड्ड्याकडे झुकला जात असल्याने कुठल्याही क्रेनचा आधार न घेता झाडाचे सहजतेने पुनर्रोपन करण्यात उद्यान विभागाला यश आले. झाडाच्या पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे 20 ते 25 दिवस चालल्याचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचेही सहकार्य
झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही.एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसीत करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला. त्यांच्या सल्ल्यानुसार झाडाच्या आजुबाजूला चार पाईप टाकण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी दिले जाते. तर इतर तीन पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा केला जातो. मे महिन्यातील वादळानंतर पुन्हा ऊन वाढली आणि पुढे जुलै महिन्यात सतत मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र अशाही परिस्थितीत झाड टिकून आहे ही बाब आनंददायी आहे. आज झाडाच्या प्रत्येक फांदीवर नवीन पालवी फुटू लागली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत १५० वर्ष जुने झाड वाचवून त्याला नवजीवन देण्यासाठी मनपाच्या उद्यान आणि इतर विभागाच्या कर्मचा-यांनी समन्वयाने एकत्रितरित्या काम केले. या सर्वांच्या कार्यामुळे झाडाला नवजीवन देता आल्याची भावना उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
