(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना नियमांचे उल्लंघन, माजिवाडयात वाहतूक विभागाची 9 बसवर कारवाई
ठाण्याच्या माजिवडा परिसरातून उत्तरप्रदेश, बिहार अशा परराज्यात जाणाऱ्या बस होत्या. या बसमधून जाण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.
ठाणे : ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा आणि मिनी लॉकडाऊन यामुळे परराज्यातील नागरिकांनी ठाण्यातून काढता पाय घेतला आहे. दरम्यान या परराज्यात जाणाऱ्या बसमध्ये कोव्हीड नियमनाचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक विभागाने तब्बल 9 बसवर कारवाई केली.
ठाण्याच्या माजिवडा परिसरातून उत्तरप्रदेश, बिहार अशा परराज्यात जाणाऱ्या बस होत्या. या बसमधून जाण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. गर्दी करणे, मास्क न वापरणे, परवाना नसणे, यासोबतच सोशल डिस्टन्सचे उल्लंघन आणि कोव्हीड नियमांची पायमल्ली करण्यात येत होती. अनेक प्रवासी हे विनामास्क स्थानकावर होते. ही बाब लक्षात आल्यानंतर वाहतूक विभागाने 9 बसवर कारवाई केली. तर बसमध्ये 50 टक्के पेक्षा अधिक प्रवासी, प्रवास भाडे वसूली करणे यामुळे वाहतूक विभागाने 9 बस थांबवून ठेवल्या. तर अन्य बस परराज्यात रवाना करण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीच्या आधारे परराज्यातील नागरिक हे आपल्या मूळगावी उत्तरप्रदेश आणि बिहार याठिकाणी निघाले होते. माजिवडा येथून परराज्यात जाणाऱ्या बस मिळतात. म्हणून हे नागरिक मोठ्या संख्येने सकाळपासूनच माजिवड्यात जमले होते. वाहतूक विभागाने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 9 बसवर कारवाई केली.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज दिवसभरात 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 36 हजार 130 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 8 हजार 938 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191 वर पोहोचली आहे. तर सध्या 5 लाख 21 हजार 317 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 26 लाख 49 हजार 757 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. रुग्ण बरं होण्याचा दर 82.05 टक्के आहे. राज्यातील मृतांचा आकडा 57 हजार 028 वर पोहोचला आहे. मृत्यूदर 1.77 टक्के आहे.