उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना मोठा दिलासा, ईडीच्या विरोधानंतरही विशेष कोर्टानं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला
Shrishar Patankar Latest News : सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेले उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

Shrishar Patankar Latest News : गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात एकीकडे सत्ता गमावलेल्या उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र दुसरीकडेच सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेले उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा रिपोर्ट सीबीआयकडून कोर्टात सादर करण्यात आलाय आणि कोर्टानं तो स्वीकारला आहे.
84.6 कोटीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.या प्रकरणात ईडीनं केलेल्या कारवाईत श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्तही करण्यात आली होती. मात्र ईडीचा विरोध असूनही काल विशेष सीबीआय न्यायालयानं सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना आरोपी बनवण्यात आलेल्या प्रकरणात सीबीआयनं सादर केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं मान्य केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास थांबवण्यास मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं केंद्रीय तपासयंत्रणेला हिरवा कंदील दाखवलाय.
किरीट सोमय्यांनी केले होते आरोप
मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असणारे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरुन किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. सोमय्यांनी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले होते.























