मुंबईत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आधी सोय, मगच ठाणे जिल्हाबंदीबाबत विचार : एकनाथ शिंदे
मुंबईला कामाला जाणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत प्रवेश न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानंतर ठाणे महापालिकेची सीमाही बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.
मुंबई : मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेची सीमा सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ठाणे महापालिकेची हद्दही बंद करण्याचा सूर उमटू लागला आहे. परंतु सध्यातरी असा कोणताही निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांची आधी सोय केली जाईल, मगच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. आपापल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक महापालिकेचे आयुक्त तसंच लोकप्रतिनिधी खबरदारी घेत आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे गैरसमज असता कामा नये, असंही एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.
मुंबईला कामाला जाणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत प्रवेश न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. उल्हासनगर महापालिकेनेही असाच निर्णय घेतला आहे. त्यातच ठाणे महापालिकेची सीमाही बंद करण्याची मागणी होऊ लागली. परंतु या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्याऐवजी भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचं म्हटलं.
एकनाथ शिंदे, ठाण्याचे पालकमंत्री यावर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हमाले की, "मुंबईमधील आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी जे ठाणे जिल्ह्यात काम करतात, त्यांच्या कामाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने ही विनंती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्तही यासंदर्भात प्रयत्न करत आहेत. कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी राहून काम केलं तर सोयीचं होईल. मात्र सध्यातरी असा कोणताही निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांची आधी सोय केली जाईल, मगच निर्णय घेतला जाईल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रोखता येणार नाही. ते जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं ही सामूहिक जबाबदारी आहे आहे. सीमा बंदची चर्चा ही केवळ आरोग्याच्या दृष्टीने सुरु आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी सरकारला आहे. परंतु जाचक बंधनं टाकता येणार नाही. प्रत्येक महापालिकेचे आयुक्त, लोकप्रतिनिधी आपापल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेत आहेत. परंतु मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेऊ शकतील."
मुंबईला जाणाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत नो एन्ट्री, सर्व सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना नियम लागू
विजय सिंघल, ठाणे मनपा आयुक्त "अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ठाण्यातून मुंबईत जातात आणि परत येतात. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्द्यावर चर्चा झाली. ठाण्यातून मुंबईला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची यादी पाठवून संबंधित रुग्णालय, कार्यालय, बँकेने त्यांची सोय करावी असं ठरलं आहे. कर्मचारी मोबाईल क्रमांकासह 1134 कर्मचाऱ्यांची यादी मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणाजवळच या कर्मचाऱ्यांची मुंबईत सोय केली जाईल, असं मला वाटतं."
अस्लम शेख, मुंबईचे पालकमंत्री "कोरोना योद्ध्यांबाबत महापालिकेचा दृष्टीकोन चुकीचा आहे. कामाचं कौतुक करण्याऐवजी भेदभावाची वागणूक दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी एमएमआर क्षेत्रात राहतात. त्यामुळे त्यांच्यासोबत भेदभाव करणं योग्य नाही."
मुंबईतील कर्मचाऱ्यांना ठाण्यात प्रवेशबंदीचा प्रस्ताव विचारधीन; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया