सोनू सूद देवदूत वगैरे नाही, करोडो रुपये येतात कुठून? : संजय राऊत
अभिनेता सोनू सूदने या मजुरांना मदतीचा हात दिला आणि शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची त्याने सोय केली. मात्र मजुरांसाठी हिरो ठरलेल्या सोनूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी सोनूवर निशाणा साधताना म्हटलं की, “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले. ‘लॉक डाऊन’ काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली.”
सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस निघतील व एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. तसा करार आधीच झाला असेल म्हणून सोनू सूद लॉक डाऊनचा मालामाल हीरो म्हणून तळपत राहिला. इतर सर्व हिरो लॉक डाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरून निघाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले. सोनू सूद हा एक उत्तम अभिनेता आहेच. सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावरही उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते.सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता? त्याचा खुलासा लवकरच होईल, असंही शेवटी संजय राऊतांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर टीका
मुंबईत अडकलेल्या मजुरांना मदत करणाऱ्या सोनू सूदवर टीका म्हणजे ते चर्चेत राहण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. काहीतरी बोलून कोरोनाचा फोकस ते बदलत आहेत. चांगलं काम करणाऱ्यांचे कौतुक झाले पाहिजे, असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.