(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी
Sanjay Raut Bail : प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण झाल्यानंतर संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Sanjay Raut Bail Plea will be Heard on September 27 : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील (Patra Chawl Land Scam Case) आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊतच्या जामीन अर्जावर (Sanjay Raut Bail) सुनावणी होणार आहे.
आज (बुधवार) संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. पण मुंबईतील वाहतूक कोंडीमुंळ संजय राऊतांना कोर्टात पोहचण्यास उशिर झाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात संजय राऊतांना तब्बल दीड तास उशिरानं हजर करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच संजय राऊतांच्या जामीन अर्जवार 27 सप्टेंबरला घेण्याचं कोर्टाकडून निश्चित करण्यात आलं होतं. कोर्टानं राऊतांना सुनावणीला हजर होण्यासाठी लागलेल्या विलंबाचीही नोंद घेतली आहे.
19 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. आता संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबईतील गोरेगावमधील कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीनं काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा या आरोपपत्रातून ईडीनं केला होता. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची गेल्या सुनावणीत न्यायालयानं दखल घेतली होती. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असं संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयानं ईडीला दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर प्रत देऊ असं ईडीनं सांगितलं होतं. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करत असल्याचं कोर्टानं म्हटलं.
संजय राऊतांवर आरोप नेमके काय?
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपली. त्यामुळे आज संजय राऊतांची कोठडी आणि जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी झाली, ज्यात त्यांना कोणताही दिलासा न देता कोठडी 14 दिवसांनी वाढवण्यात आली.
संजय राऊत यांच्यावरील कारवाई द्वेषातून किंवा राजकीय सूडबुद्धीनं झालेली नसल्याचं स्पष्ट करत राऊतांचा दावा ईडीनं नाकारला आहे. संजय राऊतांनी आपल्या विश्वासू प्रवीण राऊतसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केलेलं आहे. या प्रकरणी तपास अजून सुरू असून राऊत हे राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे ते जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि अशा प्रकरणात साक्षीदारांना धमकावल्याची अनेक उदाहरणं आहेत, असा दावा करत ईडीनं संजय राऊतांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला.