एक्स्प्लोर
Advertisement
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचा छळ झालेला नाही, वैद्यकीय अहवालात साध्वीच्या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण
सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट आणि मानवाधिकार आयोग यापैकी कुठंही हा आरोप सिद्ध झालेला नाही. साल 2015 मध्ये तर मानवाधिकार आयोगानं याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाला क्लीन चीट दिलेली आहे.
मुंबई : 2008 च्या मालेगाव ब्लास्ट केसमध्ये आरोपी असलेली साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ऑक्टोबर 2008 ते एप्रिल 2017 पर्यंत जेलमध्ये होती. यादरम्यान नोव्हेंबर 2008 च्या दरम्यान एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कोठडीत तिचाच सहकारी भिम पसरीचा याला जबदस्तीनं साध्वीला बेदम मारहाण करण्यास भाग पाडलं होतं, असा आरोप साध्वीनं केला होता, मात्र यादरम्यान तिला दोनवेळा कोर्टात रिमांडसाठी हजर केलं होतं तेव्हा तिनं याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलं नव्हतं. तसेच या दरम्यान तिच्या वैद्यकीय चाचणीतही अशी कोणतीही बाब समोर आली नव्हती.
शिवसेना हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख पवनकुमार गुप्ता यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. साध्वीबाबतच्या आरोपांत तक्रारदारानं म्हटलं होतं की, 9 वर्षांच्या कोठडीत वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. तसेच त्यांचा प्रचंड लैंगिक आणि मानसिक छळ होत आहे. साल 2014 मध्ये केंद्रीय मानवाधिकार आयोगानं यासंदर्भात चौकशी समितीची नेमणूक केली होती. त्यानुसार डीआयजी आर.एस. खैरे यांच्या अध्यक्षतेखाली वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीनं आपला अहवाल सादर केला होता. ज्यात जेल प्रशासन, इतर कैदी आणि ज्या हॉस्पिटलमध्ये साध्वीला दाखल करण्यात आलं होतं. तिथं केलेल्या चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारावर या आरोपांत तथ्य नसल्याचं या समितीनं म्हटलं होतं.
शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी कस्टडीत अमानूष छळ केला होता, म्हणून मी त्यांना छाप दिला होता की तुमचा सर्वनाश होईल. आणि त्यानंतर 2611 च्या दहशतवादी हल्यात करकरे मारले गेले, असं विधान करणाऱ्या साध्वीच्या दाव्यात कितपत तथ्य आहे? हाच खरंतर मोठा सवाल आहे. कारण सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट आणि मानवाधिकार आयोग यापैकी कुठंही हा आरोप सिद्ध झालेला नाही. साल 2015 मध्ये तर मानवाधिकार आयोगानं याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाला क्लीन चीट दिलेली आहे.
मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षासह भाजपमधील नेत्यांनीही साध्वी प्रज्ञांच्या या विधानावर आक्षेप घेत टीका केली आहे.
प्रज्ञा सिंह म्हणतात.. तुम्हाला 15-20 पुरुष बेल्टने मारत असतील, निर्वस्त्र करुन उलटं टांगत असतील तर काय कराल?
चोहीबाजूने टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली असली तरी त्या मात्र त्यांच्यावरच अन्याय झाला असल्याचे सांगत आहेत. जर तुम्हाला 15-20 पुरूष बेल्टने मारहाण करत असतील आणि निर्वस्त्र करून उलटं टांगून ठेवत असतील तर तुम्ही काय करणार? असा सवाल साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे.
प्रज्ञा सिंह यांना एका महिला पत्रकाराने याविषयी प्रश्न केला असता त्यावर उलट प्रश्न करत साध्वी म्हणाल्या की, तुम्ही स्त्री आहात. जर तुम्हाला 15-20 पुरूष बेल्टने मारत असतील, निर्वस्त्र करून मारत असतील. तर हे कोणत्या कायद्यात मोडतं?
पुढे त्या म्हणाल्या की, दहशतवाद्यांच्या गोळीने जे मृत पावतात त्यांना शहीद दर्जा मिळतो. मी माफी मागितली आहे. मला 9 वर्ष प्रताडित करणाऱ्या लोकांकडून तुम्ही माफी मागवू शकता का? असा सवालही त्यांनी केला.
हेमंत करकरेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. 'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञांनी केलं होतं.
गुरुवारी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञाने 'शहीद हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं विधान केलं होतं. या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर साध्वीने माफी मागितली आहे. "माझ्या वक्तव्याचा देशाचा शत्रूंना फायदा होतोय असं मला वाटत आहे. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते", असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने म्हटले आहे.
भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंहला उमेदवारी
भाजपने मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने बुधवारी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच उमेदवारी जाहीर झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement