Mumbai Local : निर्बंधमुक्त लोकल प्रवास, मुंबईकरांना कोरोनापूर्वीच्या प्रवासाची आठवण
आज निर्बंधमुक्त लोकल प्रवास सुरु झाल्यानंतर अनेकांनी कोरोना आणि लॉकडाऊनपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच जरी मास्क सक्ती नसली तरी जबाबदारी म्हणून मास्क वापरणार असल्याचे प्रवाशांनी सांगितलं.
![Mumbai Local : निर्बंधमुक्त लोकल प्रवास, मुंबईकरांना कोरोनापूर्वीच्या प्रवासाची आठवण Restriction free local train journey, Mumbaikars remember the journey before Corona Mumbai Local : निर्बंधमुक्त लोकल प्रवास, मुंबईकरांना कोरोनापूर्वीच्या प्रवासाची आठवण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/5069ff05faa31223c34a2a147f49c074_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर मुंबईतील लोकल ट्रेनचे प्रवासी देखील मोकळा श्वास घेत आहेत. आजपासून युनिव्हर्सल पासचे बंधन देखील असणार नाही. तसंच लोकलमध्ये मास्क सक्तीही नाही. त्यामुळे कोरोनापूर्वी असलेला प्रवास पुन्हा अनुभवता येणार आहे. लॉकडाऊन काळात लोकल सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी हालअपेष्टा सहन करत प्रवास केला. मात्र टप्प्याटप्प्याने लोकल सुरु झाली आणि लोकांचा त्रास कमी झाला. आज निर्बंधमुक्त प्रवास सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्याच आठवणींना उजाळा दिला. तसंच जरी मास्क सक्ती नसली तरी जबाबदारी म्हणून मास्क वापरणार असल्याचे प्रवाशांनी सांगितलं. मात्र याचा परिणाम म्हणून आजपासून लोकलमधील गर्दी वाढू शकते, असंही मत काही प्रवाशांनी व्यक्त केलं.
मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर मुंबई पोलीस दंड आकारणार नाहीत
मुंबई शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस आजपासून कोणताही दंड आकारणार नाहीत. मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने 19 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती. त्यानंतर महापालिकेने दंड आकारण्याचे अधिकार पोलिसांना दिले होते. आजपासून मुंबई महापालिकेने हे अधिकार पोलिसांकडून परत घेतले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडील दंडाची पावती पुस्तके आणि आतापर्यंत आकारलेली दंडाची रक्कम जमा करण्याची विनंती महापालिकेने केली आहे.
राज्यात मास्कचा वापर आता ऐच्छिक
आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधापासून मुक्तता मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ज्यांना मास्क वापरायचा आहे त्यांनी वापरावा, तुमच्या सुरक्षेसाठी मास्कचा वापर करा असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध आजपासून हटवले
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठी घट पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तर एकही कोरोना रुग्ण आढळत नाही. त्यातच सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (31 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 1 एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील. जवळपास दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधात बांधलेला महाराष्ट्र आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निर्बंधमुक्त होत आहे.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)