लॉकडाऊन काळात सायकलच्या मागणीत वाढ, ग्राहकांना दोन महिन्यांची वेटिंग
अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इथंही सध्या अशीची काहीशी परिस्थिती आहे. तिथल्या लोकांची मागणी वाढल्यानं भारतीयांना सध्या विदेशी ब्रँडसाठी वाट पाहावी लागतेय.
मुंबई : जर तुम्ही सध्या एक उत्तम सायकल घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या टू व्हिलर किंवा फोर व्हिलरप्रमाणे योग्य असं प्लानिंग करावं लागेल. कारण मुंबईत सध्या सायकलसाठी वेटिंग लिस्ट सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या चार महिन्यांत जगभरात सायकलची रेकॉर्डब्रेक विक्री झाल्यानं मुंबईसह जगभरातील सर्व महानगरांमध्ये सध्या हीच अवस्था आहे.
लॉकाडाऊनच्या काळात जगभरात सायकलची रेकॉर्डब्रेक विक्री सुरू असल्यानं मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाहीये. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इथंही सध्या अशीची काहीशी परिस्थिती आहे. तिथल्या लोकांची मागणी वाढल्यानं भारतीयांना सध्या विदेशी ब्रँडसाठी वाट पाहावी लागतेय. त्याचसोबत भारतीय बनावटीच्या ब्रँडनाही चांगलीच मागणी असल्यानं त्यांचाही उपलब्ध स्टॉक संपल्यात जमा आहे. मुंबईतल्या काळबादेवी परिसरातील भारत सायकलचे मालक सुदर्शन बेरी यांनीही या वृत्ताला दुजारो दिलाय. मुंबईत गेली 96 वर्ष बेरी कुटुंबीय सायकलविक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या दुकानात 5 हजारांपासून 11 लाख रूपयांपर्यंतची सायकल विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबईत सध्या फायरफॉक्स या ब्रिटीश सायकल ब्रँडची चलती आहे. त्यातील 15 ते 30 हजारांपर्यंतच्या सायकलींना सध्या प्रचंड मागणी असल्याचं बेरी सांगतात. लॉकडाऊनमध्ये जिम बंद त्यामुळे काहीजण फिटनेससाठी तर काहीजण रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीला पर्याय म्हणून सायकलचा विचार करत आहेत. अनलॉकच्या पहिल्याच टप्यात सायकलींना इतकी मागणी होती की गोडाऊनमधला स्टॉक हातोहात संपला. सध्या त्यांच्याकडे सालकलसाठी 2 महिन्यांचं वेटिंग सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या अनेकजण ऑफिसला जाण्या येण्यासाठीही सायकलचा वापर करत आहेत. त्यांची बॅटरीवाल्या सायकलला अधिक पसंती आहे. एका चार्जवर ही बॅटरी किमान चार तास ताशी 25 किमीच्या वेगानं धावू शकते. त्यामुळे एखाद्या दुचाकीप्रमाणेही ही सायकल वापरता येणं शक्य आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जिथं अनेक व्यावसायिक कसेबसे तग धरून आहेत तिथं काहींची अशा पद्धतीने अचानक भरभराटही झाली आहे. सायकल व्यावसायिक हे त्यापैकीच एक. त्यामुळे गेल्या 100 वर्षांत कधी नव्हे ती सायकलसाठी मुंबईत अॅडव्हान्स बुकींग सुरू आहे.