(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Phone Tapping : मंत्री आव्हाडांचा पुन्हा रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप तर मुख्य सचिवांची गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
Phone Tapping : फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत शुक्लांवर आरोप केले आहेत.
मुंबई : परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत शुक्लांवर आरोप केले आहेत. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2021
अजून पुरावे काय पाहिजेत.
राज्याच्या मुख्य सचिवांनी बोलावली गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवही उपस्थित राहणार आहेत. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल तयार करण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती आहे. फोन टॅपिंग झालं तेव्हा कुंटे हे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते. आपल्याकडून या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचं काल कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसंच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचंही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. प्रकरणात आता सविस्तर अहवाल तयार केला जात असल्याची माहिती आहे.
फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती- आव्हाड
रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी काल केला होता. यामध्ये अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले असा दावाही त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, 'कोणालाही फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त मुख्य गृह सचिवांची रितसर परवानगी लागते, रश्मी शुक्लांनी अमुक एका क्रमांकासाठी परवानगी घेतली होती का, या प्रश्नाचं उत्तर कुंटे यांनी नकारात्मक स्वरुपात दिलं. पोलीस बदली रॅकेट प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी परवानगी शिवाय फोन टॅपिंग केलेच कसा असा सवाल केला आहे. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली आहे. 'रश्मी शुक्ला या पोलीस अधिकारी आहेत म्हणून कोणत्याही नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकतात', असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. फोन टॅपिंग करता नियम व कायदे आहेत, या प्रकरणात असे दिसते की अधिकार्यांना वाटलं की ते काहीही करु शकतात आणि याची कोण खात्री देईल की अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते? असा गंभीर आरोप मंत्री आव्हाड यांनी केला आहे.