वाहतूक विभागाचा दंड भरा नाहीतर गाडी जप्त होईल; वाहतूक शाखेच्या उपायुक्तांचा इशारा
दंड न भरल्यास 1 डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवून गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गाड्या ताब्यात घेण्यापासून ते गाडी परवाना निलंबनाचीही कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
ठाणे : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून वाहतूक पोलिसांनी या वर्षभरात जवळपास 22 कोटी रुपयांची चलान फाडले आहेत. त्यातही जवळपास 13 कोटी रुपयांची वसुली झाली नसून आता दंडाची प्रलंबित रक्कम भरण्यासाठी चालकांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दंड न भरल्यास 1 डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवून गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गाड्या ताब्यात घेण्यापासून ते गाडी परवाना निलंबनाचीही कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर पत्रिपूलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी चार दिवस घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाईचा आकडा मोठा असला तरी दंडाची रक्कम वसूल होत नाही. कारण, वाहन चालक दंडच भरत नाहीत. थकीत रकमेचा आकडा मोठा असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे दंडाची थकबाकी वसूल करण्यासाठी वाहतूक शाखेने प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या दहा दिवसांमध्ये प्रलंबित असलेल्या ई चलानची रक्कम भरण्याची मुदत चालकांना देण्यात येत आहे. अन्यथा 1 डिसेंबरनंतर दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम प्रलंबित असलेल्या चालकांवर केसेस करण्यात येतील. ही कारवाई करत असताना मोटार वाहन कायदा कलम 207 अन्वये गाडी ताब्यात घेतली जाऊ शकते. तसेच गाडी परवाना निलंबनाची कारवाई होईल. या कारवाईने नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मुदतीत नागरिकांनी दंडाची थकीत रक्कम भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.
करोनामुळे पोलिसांनी ही दंडाची रक्कम वसूल केली नाही. परंतु आता मात्र वाहतूक पोलिसांनी 10 दिवसांचे अल्टिमेटमच दिलं आहे. आता वाहतूक पोलिसांकडून पेंडिंग ई-चलानची संपूर्ण वसुली करण्यात येणार आहे. तसेच सेवा रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.