सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभा नवीन कायद्याने दिली का? देवेंद्र फडणवीस यांचा संतप्त सवाल
सामान्य जनतेला आणि सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय आहे का? सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने सरकारला दिली का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
![सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभा नवीन कायद्याने दिली का? देवेंद्र फडणवीस यांचा संतप्त सवाल opposition leader devendra Fadnvais on sanjay rathod case and government stand सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभा नवीन कायद्याने दिली का? देवेंद्र फडणवीस यांचा संतप्त सवाल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/28192001/Devendra-Fadanvis.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. सगळे पुरावे असताना कोणतीही कारवाई संजय राठोडयांच्यावर होत नाही, याबद्दल फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे हे सर्व शक्य होत आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुरावे समोर असताना कुठलीही कारवाई होत नाही. एवढे पुरावे एखाद्या प्रकरणासाठी पुरेसे आहेत. पुरावे असताना पोलीस कारवाई करत नाही, मंत्री राजीनामा देत नाही, सरकारही काही कारवाई करत नाही. त्यामुळे मी या प्रकरणात संजय राठोड यांना दोष देणार नाही. त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. म्हणून हे सर्व शक्य आहे. त्यामुळे राज्यात या सरकारचा चेहरा उघड झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
'शक्ती' कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य आज राजीनामा देणार
आम्हाला या सरकारला एवढंच विचारायचं आहे, की सामान्य जनतेला आणि सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय आहे का? सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने दिली का? कोणती नवी शक्ती या नेत्यांना तुम्ही दिली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विचारला. शक्ती कायदा वैगेरे सगळा फार्स आहे. कायदे करुन काहीही हाती येणार नाही. कारण हे कायदे सत्ता पक्षाला लागू होत नाहीत. त्यामुळे संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामा देणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
त्या पोलीस निरीक्षकाचा तात्काळा राजीनामा घ्यावा
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून पुणे पोलिसांवरही फडणवीस यांनी टीका केली. सगळे पुरावे असताना साधा एफआयआर दाखल होऊ नये हे आश्चर्य आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव संपूर्ण भारतात घेतलं जातं, त्यांची झालेली लाचार अवस्था आम्ही याआधी कधी पाहिलेली नाही. पुणे पोलिसांच्या ज्या पोलीस निरीक्षकांकडे या प्रकरणाचा तपास आहे त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Pooja Chavan Death Case | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे लष्कर कोर्टात खटला दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)