'भाजप निवडणूक आयोगा'चे दानवे आयुक्त, विरोधकांची टीका
काँग्रेसने भारतीय निवडणूक आयोग हा भाजप निवडणूक आयोग आणि दानवे त्यांचे निवडणूक आयुक्त झाल्याची टीका केली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांची अधिसूचना मार्च महिन्यात निघेल अशी माहिती कार्यकर्त्यांना दिल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. निवडणूक आयोगाआधी दानवेंकडे ही माहिती कशी आली असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. यावरुन विरोधकांनी दानवे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.
लोकसभेच्या अधिसूचना कधी निघणार हे एका पक्षाच्या प्रमुखाला कळतं हे आश्चर्य आहे. निवडणूक आयोगावर नियंत्रण कोणाचं हे यातून स्पष्ट होत आहे. सर्व यंत्रणा ताब्यात घेण्याच्या भाजपच्या वृत्तीमुळेच त्यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे. निवडणुकीचा प्लॅन आधीच ठरलेला आहे आणि यात मोदींपासून सर्वांचा सहभाग आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
तर काँग्रेसने भारतीय निवडणूक आयोग हा भाजप निवडणूक आयोग आणि दानवे त्यांचे निवडणूक आयुक्त झाल्याची टीका केली आहे.
काय म्हणाले होते दानवे ? धुळ्यात शनिवारी पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर दानवे कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघेल, अशी माहिती त्यांनी कार्यकर्त्यांनी दिली. तसेच कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.
रावसाहेब दानवेंनी ज्या तारखा घोषित केल्या त्या कदाचित अंदाज असतील. मात्र यापूर्वी घडलेल्या काही घटना संशय निर्माण करणाऱ्याच होत्या. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी कर्नाटक निवडणुकांच्या तारखा आयोगाच्या आधीच ट्वीट केल्या होत्या. तर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित करण्यासाठीची पत्रकार परिषद आयोगानं पुढे ढकलल्यानंही वाद झाला होता. 6 ऑक्टोबरला नरेंद्र मोदींची राजस्थानातील अजमेरमध्ये सभा होती, त्याआधी आयोगाची पत्रकार परिषद होती.
संबंधित बातमी