एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या निर्णयामुळे दहशतवाद्यांचे फंडिंग बंद झाले: पर्रिकर

मुंबई: 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर दहशतवाद्यांना मिळणारे फंडिंग बंद झाले असून, सुरक्षा रक्षकांवरही होणारी दगडफेक थांबली असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधानांच्या या धाडसी निर्णयाबद्दल पर्रिकरांनी त्यांचे आभारही यावेळी व्यक्त केले. या निर्णयानंतर आमली पदार्थांवरही प्रतिबंद आणण्यास मदत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पर्रिकर म्हणाले की, '' यापूर्वी सुरक्षा रक्षकांवर दगडफेकीसाठी 500 रुपये, तर इतर कामांसाठी 1000 रुपये असे दर निश्चित होते. पण पंतप्रधानांच्या निर्णयाने दहशतवाद्यांना मिळणारे फंडिंग बंद झाले आहे. या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा रक्षकांवर होणारी दगडफेक थांबली आहे. त्यामुळे मी पंतप्रधानांचे अभिनंदन करतो.'' नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांचे फंडिंग थांबल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. दरम्यान, 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर देशभरातील सर्वच बँका आणि एटीएम सेंटर बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या निर्णयाचे देशभरातील जनतेने स्वागत केले असले, तरी अनेकांनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























