(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitesh Rane: कडवट हिंदू गृहमंत्री, बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री अन् जिहाद्यांचा बाप पंतप्रधान: नितेश राणे
Nitesh Rane in Mumbai: नितेश राणेंचं आगपाखड करणारं भाषण, हिंदूंवर अन्याय खपवून घेणार नाही.
मुंबई: मुंबईतील पालिकेचा एम वॉर्ड हा मिनी बांगलादेश झाला आहे. स्थानिक पातळीवरील पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने येथील मुस्लिमांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या भागातील मोहल्ल्यांमध्ये हिंदू नागरिक जाऊ शकत नाहीत, इतकी दहशत आहे. मात्र, आता आम्ही हे खपवून घेणार नाही. आमच्या मोदींच्या नजरेखाली कोणत्याही हिंदू नागरिकावर अन्याय होणार नाही. सध्याच्या घडीला मंत्रालयात कडवट हिंदू गृहमंत्रीपदी बसलाय, बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री आहे आणि जिहाद्यांचा बाप नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. ते शनिवारी मुंबईच्या मानखुर्द परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात नितेश राणे यांनी आक्रमकपणे हिंदुत्त्ववादी भूमिका मांडली. आता केवळ अयोध्येपर्यंत थांबायचे नाही. अभी काशी, मथुरा बाकी है, असे राणेंनी म्हटले. यावेळी नितेश राणे यांनी येथील मशिदीच्या बांधकामावरही आक्षेप नोंदवला. येथील नूर ए मस्जीद ही म्हाडाच्या जमिनीवर बांधण्यात आली आहे. हे अधिकार कोणी दिले? ही मशीद १५ दिवसांत हटवली नाही तर याठिकाणी आम्ही बुलडोझर फिरवू, असा इशारा नितेश राणे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिला. याठिकाणी असणाऱ्या हर्षद काळे या अधिकाऱ्याने आज मी येणार म्हणून सुट्टी घेतली. तर महादेव कोळी नावाचा पोलीस अधिकारी ५० हजार रुपयांमध्ये झोपडी विकतो. याबद्दल मी त्याच्या वरिष्ठांना आणि गृहमंत्र्यांना माहिती देणार आहे. या दोघांकडून कांदळवनाच्या परिसरात अल्पसंख्याकांची अनधिकृत वस्ती वसवली जात आहे. या देशात आदी हिंदूंचे अधिकार मग बाकीच्यांचे अधिकार. तुमचा इथला आमदार माझे काही करु शकत नाही. विधानसभेत मी त्याची केलेली अवस्था तुम्ही पाहिली असेल, असे नितेश राणे यांनी म्हटले.
माझा बॉस 'सागर’ बंगल्यावर बसलाय: नितेश राणे
काही दिवसांपूर्वी नितेश राणे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यांनी म्हटले होते की, आपण इतर धर्मीयांच्या सणांमध्ये अडथळे आणत नाही. आपल्या सणात इतरांचे अडथळे येऊ लागले आहेत. तसं झालं तर शांत बसू नका. यापुढं कार्यक्रम करून टाकला हे सांगायला फोन आला पाहिजे. कार्यक्रम झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवायची जबाबदारी आमची आहे. पोलिसांच्या समोर बोलतो. माझं काही वाकडं करू शकत नाही. आमचा बॉस बसलाय सागर बंगल्यावर. काही होत नाही आम्हाला, अशी गर्जना नितेश राणे यांनी केली होती.
आणखी वाचा
पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय: नितेश राणे
"माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार, मी मोठ्या प्रमाणात संघाच्या विचारांची पुस्तक वाचतो" : नितेश राणे