सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टानं वकिलांच्या भेटीशी संबंधित अर्ज फेटाळला
ठाणे सत्र न्यायालयात सचिन वाझेंनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 30 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. तर ठाणे सत्र न्यायालयाकडनं शुक्रवारी एटीएसला वाझेंचं प्रॉडक्शन वॉरंट जारी केलं आहे.
मुंबई : सचिन वाझेंच्या अडचणीत आता आणखीन वाढ होण्याची चिन्ह आहेत. सचिन वाझे चौकशीत सहकार्य करत नाही. एनआयएनं मुंबई सत्र न्यायालयात याचा पुनरूच्चार केला आहे. तसेच परवानगी देऊनही सचिन वाझेंचे वकील चौकशीच्यावेळी उपस्थित राहत नसल्याचं एनआयएनं कोर्टाला सांगितलं आहे.
दरम्यान ठाणे सत्र न्यायालयात सचिन वाझेंनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 30 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. तर ठाणे सत्र न्यायालयाकडनं शुक्रवारी एटीएसला वाझेंचं प्रॉडक्शन वॉरंट जारी केलं आहे. मनसुख हिरण प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसला या प्रकरणातील चौकशीसाठी आता सचिन वाझेंची कस्टडी हवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एटीएसकडे मनसुख हिरण प्रकरणात सचिन वाझेंविरोधात पुरावे उपलब्ध असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. यात त्यांनी नोंदवलेल्या साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे, कॉल रेकॉर्ड डेटा आणि इतर पुराव्यांचा समावेश आहे. यावर 30 मार्च रोजी पुढची सुनवाणी होणार आहे. सचिन वाझे सध्या दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या आलिशान घराबाहेर स्फोटकं सापडल्याचा तपास करणाऱ्या एनआयएच्या ताब्यात आहेत. एनआयए कोर्टानं 25 मार्चपर्यंत वाझेंना एनआयए कोठडी सुनावली आहे.
तर दुसरीकडे शुक्रवारी सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टाकडनंही दिलासा मिळू शकला नाही. एनआयए कोर्टानं सचिन वाझेंशी संबंधित दोन अर्ज शुक्रवारी फेटाळून लावले. यातील एक अर्ज सचिन वाझेंचा होता तर दुसरा तपासयंत्रणा एनआयएनं दाखल केला होता. मात्र हे दोन्ही अर्ज सचिन वाझेंच्या वकिलांच्या उपस्थितीशी संबंधित होते.
सचिन वाझेंनी अर्ज केला होता की, वकिलांशी बोलताना एनआयए अधिका-यांची उपस्थिती नको. त्यामुळे कोर्टाच्या यासंदर्भातील आदेशांच स्पष्टीकरण द्या. एनआयए कोर्टानं हा अर्ज फेटाळताना, दिलेले आदेश स्पष्ट असल्यानं अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही. कोर्टानं यासंदर्भात वाझेंचा अर्ज अशंत: मान्य करत चौकशीच्यावेळी त्यांच्या वकिलांना हजर राहण्याची मुभा दिलेली आहे. तर दुसरा अर्ज एनआयएचा याचसंदर्भात होता की, वाझेच्या वकिलांना हजर राहण्याचे निर्देश द्या. कारण वकिल नसल्यानं वाझे चौकशीत उत्तर देत नाहीत अशी एनआयए तक्रार होती. मात्र आरोपी उत्तर देत नाही, तो तुमचा प्रश्न आहे. या तक्रारी कोर्टाला सांगू नका. असं स्पष्ट करत कोर्टानं एनआयएचा अर्जही फेटाळून लावला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Antilia Explosives Scare | स्फोटक प्रकरणात जप्त केलेल्या वस्तू आणि गाड्यांच्या तपासासाठी पुणे फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल
- Antilia Explosives Scare | स्फोटक प्रकरणात NIA ला राज्याचे संपूर्ण सहकार्य, अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार : गृहमंत्री अनिल देशमुख
- Sachin Vaze | 'त्या' दिवसांपर्यंत सचिन वाझे सतत मनसुख हिरण यांच्याशी संपर्कात, सीडीआरमधून माहिती
- मुंबई पोलीस आयुक्तांची बदली रुटीन नव्हती, काही चुका अक्षम्य होत्या म्हणून बदली : अनिल देशमुख