Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Vijay Hazare Trophy 2025-26 : आजपासून विजय हजारे ट्रॉफी 2025-26 सुरू होत आहे. ही भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी लिस्ट अ स्पर्धा आहे.

Vijay Hazare Trophy 2025-26 Schedule Marathi News : आजपासून विजय हजारे ट्रॉफी 2025-26 सुरू होत आहे. ही भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी लिस्ट अ स्पर्धा आहे. डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही स्पर्धा जानेवारीपर्यंत सुरू राहील. देशभरातील विविध शहरांमध्ये सामने खेळवले जातील. यावर्षी, अनेक मोठी नावे या स्पर्धेत सहभागी होत आहेत, ज्यामुळे बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह टीम इंडियाचे अनेक सुपरस्टार मैदानात उतरणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. विशेषतः विराट आणि रोहितच्या उपस्थितीमुळे विजय हजारे ट्रॉफी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून!
विजय हजारे ट्रॉफीच्या 2025-26 हंगामात तब्बल 38 संघ सहभागी होत आहेत. या संपूर्ण स्पर्धेत एकूण 135 सामने खेळवले जाणार असून, ही स्पर्धा 24 डिसेंबर ते 18 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. या 38 संघांना सात-सात संघांचे चार गट आणि 6 संघांचा प्लेट गट अशा स्वरूपात विभागण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी 19 सामने खेळवले जाणार असून सुरुवातीलाच थरार पाहायला मिळणार आहे.
पहिल्या दिवशी कोणते स्टार खेळाडू मैदानात?
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दिवशीच अनेक दिग्गज खेळाडू अॅक्शनमध्ये दिसणार आहेत. विराट कोहली दिल्ली संघाकडून खेळणार असून, दिल्लीचा सामना आंध्र प्रदेशविरुद्ध होणार आहे. दिल्ली संघात विराटसोबतच ऋषभ पंत, इशांत शर्मा आणि नवदीप सैनी हेही स्टार खेळाडू असतील. त्यामुळे दिल्ली संघ पूर्णपणे स्टारपॉवरने सजलेला असेल.
रोहित शर्मा मुंबई संघाकडून मैदानात उतरणार असून, मुंबईचा पहिला सामना सिक्कीमविरुद्ध होईल. वेंकटेश अय्यर या स्पर्धेत मध्यप्रदेश संघाचे कर्णधार असतील, तर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बंगालकडून खेळताना दिसतील. ईशान किशन, जो टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघात निवडला गेला आहे, तो झारखंड संघाचे नेतृत्व करणार आहे.
याशिवाय केएल राहुल (कर्नाटक), संजू सॅमसन (केरळ), हार्दिक पंड्या (बडोदा), कृणाल पंड्या (बडोदा), शुभमन गिल (पंजाब), अभिषेक शर्मा (पंजाब), अर्शदीप सिंग (पंजाब), हे सर्व स्टार खेळाडू विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय क्रिकेटचे सुपरस्टार्स एकाच घरगुती स्पर्धेत खेळताना दिसणार असल्याने, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 हा हंगाम अविस्मरणीय ठरणार हे नक्की. आजपासून प्रत्येक सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
विजय हजारे ट्रॉफी लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?
24 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश असा सामना होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होतील, तर नाणेफेक सकाळी 8.30 वाजता होईल. मात्र, सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण उपलब्ध नसेल. स्पर्धेतील निवडक सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर पाहू शकता. तसेच, निवडक सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला जिओहॉटस्टार अॅपवर पाहायला मिळणार आहे.
विजय हजारे ट्रॉफी : 24 डिसेंबर वेळापत्रक (Vijay Hazare Trophy Schedule December 24)
- दिल्ली विरुद्ध आंध्र
- मुंबई विरुद्ध सिक्कीम
- पंजाब विरुद्ध महाराष्ट्र
- पुदुच्चेरी विरुद्ध तामिळनाडू
- मध्य प्रदेश विरुद्ध राजस्थान
- झारखंड विरुद्ध कर्नाटक
- केरळ विरुद्ध त्रिपुरा
- चंदीगड विरुद्ध जम्मू आणि काश्मीर
- आसाम विरुद्ध बडोदा
- हैदराबाद विरुद्ध उत्तर प्रदेश
- बंगाल विरुद्ध विदर्भ
- हिमाचल प्रदेश विरुद्ध उत्तराखंड
- छत्तीसगड विरुद्ध गोवा
- ओडिशा विरुद्ध सौराष्ट्र
- हरियाणा विरुद्ध रेल्वे
- गुजरात विरुद्ध सेवा
- अरुणाचल प्रदेश विरुद्ध बिहार
- मणिपूर विरुद्ध नागालँड
- मेघालय विरुद्ध मिझोराम





















