Antilia Explosives Scare | स्फोटक प्रकरणात जप्त केलेल्या वस्तू आणि गाड्यांच्या तपासासाठी पुणे फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळली होती. अशातच याप्रकरणाचा तपास सध्या एनआयए करत आहे. याप्रकरणी एनआयएकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू आणि गाड्यांची तपासणी करण्यासाठी पुणे फॉरेन्सिक टीम आता मुंबईत दाखल झाली आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थाना बाहेर स्फोटकांची गाडी उभी करण्यात आली होती. याचा तपास करत असताना एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. 17 फेब्रुवारी रोजी सचिन वाझे यांना घेऊन एनआयएचं एक पथक ठाण्यात त्यांच्या राहत्या घरी गेलं जिथून एनआयएने दोन गाड्या आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला 1 कुर्ता जप्त केला. 1 कुर्ता मुलुंड टोल नाक्याजवळ जाळण्यात आला होता. यासर्व जप्त केलेल्या गोष्टींची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी पुण्याची फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली. या पथकामध्ये एकूण 8 कर्मचारी आणि अधिकार्यांचा समावेश आहे.
25 फेब्रुवारी रोजी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर जिलेटिनच्या काड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असलेली केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक केली आहे. सचिन वाझे हेच आधी या प्रकरणाचा तपास करत होते. सचिन वाझे यांना दोन दिवसांपूर्वी ठाण्याला नेऊन त्यांच्या राहत्या घराची देखील झडती घेण्यात आली. त्यानंतर सचिन वाझे वापरत असलेल्या दोन गाड्या एनआयएने जप्त केल्या. तर जे दोन कुर्ते 25 फेब्रुवारी रोजी वापरण्यात आले होते त्यातला एक कुर्ता एनआयएने सचिन वाझे यांच्या घरातून जप्त केला. तर दुसरा कुर्ता मुलुंड टोल नाक्याजवळ जाळण्यात आला होता, ज्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे.
एनआयएने काल जप्त केलेल्या दोन गाड्यांची तपासणी आज पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. आतापर्यंत एकूण पाच गाड्या या प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 25 फेब्रुवारी रोजी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडीचा समावेश आहे. तर सचिन वाझे वापरात असलेल्या 2 मर्सिडीज बेंज, लँड क्रूझर यांचासुद्धा समावेश आहे. या सर्वांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येईल, ज्यामुळे सचिन वाझे यांच्याविरुद्ध हा आरोप सिद्ध करण्यास सबळ पुरावे मिळतील. तर दहशतवादी विरोधी पथकाकडून मनसुख हिरण यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केला जातोय, त्यामुळे त्यांच्या तपासात नेमकं काय निष्पन्न होतंय आणि सचिन वाझे यांच्या अडचणी अजून वाढत आहेत का? हा येणारा काळच सांगेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Antilia Explosives Scare | स्फोटक प्रकरणात NIA ला राज्याचे संपूर्ण सहकार्य, अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार : गृहमंत्री अनिल देशमुख
- Sachin Vaze | 'त्या' दिवसांपर्यंत सचिन वाझे सतत मनसुख हिरण यांच्याशी संपर्कात, सीडीआरमधून माहिती
- मुंबई पोलीस आयुक्तांची बदली रुटीन नव्हती, काही चुका अक्षम्य होत्या म्हणून बदली : अनिल देशमुख