Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Pandharpur News: दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2026 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 26 डिसेंबर रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

पंढरपूर: विठ्ठल भक्तांसाठी मोठी खुशखबर असून नवीन वर्षात देवाच्या सर्व पूजांचे ऑनलाईन बुकिंग 26 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजा पाद्यपूजा (Vitthal Rukmini Mata Puja) आणि इतर प्रकारच्या पूजा मिळवण्यासाठी देशभरातली भाविक प्रयत्न करीत असतात. आता नवीन वर्षात एक जानेवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीसाठीच्या पूजांचे ऑनलाईन बुकिंग 26 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याचे मंदिर समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षात भाविकांना पूजा करायचे असल्यास 26 डिसेंबर रोजी ऑनलाइन बुकिंग ( Online registration) केल्यास त्यांना देवाच्या पूजेचे संधी मिळू शकणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना अशा सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2026 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 26 डिसेंबर रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.(Vitthal Rukmini Mata Puja)
याबाबत मंदिर समितीच्या दि. 15 जून रोजी झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
Online registration: विठ्ठल रुक्मिणी च्या विविध पूजांचे देणगी मूल्य खालीलप्रमाणे
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.25,000/-, रू.11,000/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.5,000/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100/- तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी रू.7,000/- इतके देणगी मुल्य आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024, दुसऱ्या टप्प्यात दि.1 जानेवारी ते 31 मार्च 2025, तिसऱ्या टप्प्यात दि. 01 एप्रिल ते 31 जुलै 2025 तसेच चौथ्या टप्प्यात दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये देशभरातून आलेल्या भाविकांना या पूजेचा आनंद घेता आला होता.
आता, पाचव्या टप्प्यात दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2026 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व महानैवेद्य सहभाग योजना तसेच दि. 01 ते 31 जानेवारी, 2026 कालावधीतील तुळशी अर्चन पुजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा. याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगितले.























