दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी एनसीबीचा छापा, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त
छापेमारी दरम्यान करिश्माच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीने करिश्मा प्रकाशला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी दरम्यान करिश्माच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीने करिश्मा प्रकाशला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु एनसीबीने करिश्मा प्रकाशला अटक केलेली नाही.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीच्या प्रकरणात चौकशीदरम्यान अनेक ड्र्ग पॅडलर्सकडून करिश्मा प्रकाशचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर आज एनसीबीने करिश्माच्या घरी छापा टाकला. अटक केलेल्या पॅडलर्सशी केलेल्या चौकशीत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे एनसीबीला कळले की करिश्मा प्रकाश या ड्रग्ज पॅडलर्सच्या नियमित संपर्कात होती. विशेष म्हणजे दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशची ड्रग्स केसमध्ये चौकशी केली होती. दीपिका पदुकोण आणि करिश्मा प्रकाशची एकत्रितपणे चौकशी झाली होती.
त्याशिवाय एनसीबीने रिया चक्रवर्ती प्रकरणात मुंबईच्या वांद्रे भागातील एक ड्रग्स सप्लायरला अटक केली होती. अटक केलेल्या सप्लायरकडून चरस, कोकेन, गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या ड्रग्स सप्लायर आधी पकडलेल्या दक्षिण आफ्रिकेचा ड्रग्स सप्लायर अगिसियालोस डेमेट्रिएडसच्या संपर्कात होता.
एनसीबीमध्ये नोंदवलेल्या 2 एफआयआर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यामध्ये क्रमांक 15/20 एफआयआर ही ईडी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या ईडीच्या चौकशीदरम्यान काही चॅट उघडकीस आले होते, ते ईडीने एनसीबीला दिले होते. त्या आधारावर आतापर्यंत या प्रकरणात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यासारख्या मोठ्या कलाकारांची चौकशी झाली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे एफआयआर क्रमांक 16/20 मध्ये काही ड्रग पॅडलर्सला अटक करण्यात आली आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती हिच्यासह 24 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या