Nawab Malik vs Sameer Wankhede : नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर
Nawab Malik vs Sameer Wankhede : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची माळ लावत धमाका उडवून दिलाय.
Nawab Malik vs Sameer Wankhede : मुंबई ड्रग्ज केस प्रकरणानंतर (Mumbai Drugs Case) राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची माळ लावत धमाका उडवून दिलाय. नवाब मलिकांच्या सर्व आरोपाचं समीर वानखेडे यांनी खंडन केलं असून प्रत्युत्तर दिलं आहे. महिनाभरापासून नवाब मलिक दररोज नवनवीन आरोप करत पुरावे सादर करत आहेत. ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेले आरोप व्हाया वसूली समीर वानखेडे यांच्या कपड्यापर्यंत पोहचले आहेत. समीर वानखेडे यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.
महागड्या पेहरावावरुन आरोप करणाऱ्या नवाब मलिका यांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या महागड्या कपड्यांची फक्त अफवा आहे, मलिकांना त्याविषयी कमी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी खरी माहिती शोधून काढावी, असं आव्हान समीर वानखेडेंनी मलिकांना दिलंय. समीर वानखेडे (Sameer Wankhede) सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
जस्मिन वानखेडेंच्या मार्फत वसुली केल्याच्या आरोपाचंही समीर वानखेडे यांनी खंडन केलं. ते म्हणाले की, ‘सलमान नावाच्या ड्रग्ज पेडलरने माझ्या वकील बहिणीला केस घेण्यासाठी अप्रोच केलं होतं. पण माझ्या बहिणीनं केसं घेतली नाही. कारण ती एनडीपीएसच्या केस पाहत नाही. त्या व्यक्तीला बहिणीनं हाकलून दिलं होतं. बहिणीच्या मार्फत ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जात होता. मध्यस्थीच्या मार्फत आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वांमध्ये ड्रग्ज माफियांचा हात आहे. ज्या तस्कराच्या नावानं पत्र आहे, त्याला मी स्वत: अटक केली आहे. तो अद्यापही तुरुंगात आहे. त्याच्या whatsapp चॅट शेअर करत खोटे आरोप केले जात आहेत.’
जास्मिन वानखेडे यांनी काय दिलं उत्तर?
नवाब मलिक यांनी केलेले आरोप समीर वानखेडे यांची बहिण जास्मिन वानखेडे यांनी फेटाळून लावले आहे. समीर वानखेडे यांच्याकडे असलेल्या महागड्या घडळ्यांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या आईने दोन्ही मुलांना महागडी घड्याळं दिली होती, असा दावा जास्मिन वानखेडे यांनी केला. समीर वानखेडे वर्षातून एकदाच कपडे खरेदी करतात, नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असे जास्मिन वानखेडे यांनी सांगितले.
नवाब मलिकांनी काय केले होते आरोप?
नवाब मलिकांनी बोलताना म्हटलं की, "समीर वानखेडेंचे सर्व फोटो तुम्ही पाहा. त्यांचे बूट पाहा. louis vuitton चे बूट दोन-दोन, तीन-तीन लाखांचे आहेत, ते जे बदलत असतात. त्यांचे शर्ट पाहाल तर त्यांची किंमत 50 हजारांपासून सुरु होते. टी शर्ट पाहिलं तर त्याची किंमत 30 हजार रुपयांपासून सुरु होते. वानखेडेंच्या हातातील घड्याळं दररोज बदलतात, ज्यांची किंमत 20 हजारांपासून सुरु होते, ती 1 कोटींपर्यंत किमतीची आहेत. एका प्रमाणिक अधिकाऱ्याचं हे राहनीमान? मी प्रार्थना करतो की, देशातील सर्व प्रामाणिक लोकांचं राहणीमान असंच व्हावं."