मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन होणार; कसा असेल पॅटर्न?
मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. बहुपर्यायी आणि वर्णनात्मक अशा दोन्ही पद्धतींनी परीक्षा घेण्यात येणार आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या डिसेंबर-जानेवारमध्ये होणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. शिवाय, त्यासाठी शाखेनुसार पदवी, पदव्युत्तर क्लस्टर कॉलेजची विभागणी केली असून त्यामध्ये लीड कॉलेज हे परीक्षेचे नियोजन करणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणं शक्य नाही त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी क्लस्टर महाविद्यालयांची असणार आहे. सोबतच प्रात्यक्षिक, प्रकल्प, मौखिक परीक्षासुद्धा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. यामध्ये गुगल मिट, स्काइप, झुम अॅपद्वारे महाविद्यालयातील शिक्षक या परीक्षा घेतील. तर थिअरी परीक्षांचं वेळापत्रकसुद्धा क्लस्टर कॉलेजमधील लीड कॉलेज जाहीर करणार असून क्लस्टरमधील सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा या एकाच वेळी ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
साधारणपणे, पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या पदवी प्रथम सत्र परीक्षा ऑनलाइन माध्यमातून डिसेंबर 31 पर्यंत घेण्यात येणार आहेत. तर पदव्युत्तर परिक्षेबाबत स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. व्यवसायिक अभ्यासक्रम थेअरी परीक्षा 15 जानेवारी 2021 पर्यंत घेण्यात येणार आहेत. तर प्रथम वर्षाच्या वर्गाचे वेळापत्रक प्रवेश झाल्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.
कसा असणार थिअरी परीक्षांचा पॅटर्न :
पारंपरिक (कला, वाणिज्य, विज्ञान) शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परिक्षा पॅटर्न
- 60 गुणांची ऑनलाईन थिअरी परीक्षा
- 50 बहुपर्यायी प्रश्न देण्यात येतील, त्यापैकी 40 प्रश्न सोडवावे लागणार
- वेळ 1 तास दिला जाणार
व्यवसायिक अभ्यासक्रम ( इंजिनियरिंग, फार्मसी, एमसीए)
- 80 गुणांची ऑनलाइन थिअरी परीक्षा
- 40 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न, त्यासाठी 1 तासांचा वेळ
- 40 गुणांचे वर्णनात्मक प्रश्न, त्यासाठी 1 तासांचा वेळ
विधी शाखा
- एकूण 60 गुणांची परीक्षा
- 30 गुणांची बहुपर्यायी परीक्षा, वेळ अर्धा तास
- 30 गुणांची वर्णनात्मक परीक्षा, वेळ 1 तास
दरम्यान, यामध्ये ऑनलाइन निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकनाला सुरुवात करून शिक्षकांनी निकाल जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.