एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'चे निकाल जाहीर, बीएच्या 236 विद्यार्थ्यांना शून्य गुण
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलने एफवायबीए परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यामध्ये 5090 विद्यार्थ्यांपैकी 236 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहे.

फोटो : गेट्टी इमेज
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'च्या नुकत्याच जाहीर झालेल्या प्रथम वर्ष बीएच्या निकालात तब्ब्ल 236 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचं समोर आलं आहे. असे निकाल लावून, विद्यार्थी संख्या कमी करुन 'आयडॉल' बंद करण्याचा घाट घातला जात आहे का, असा सवाल स्टुडंट लॉ कौन्सिल आणि इतर विद्यार्थी संघटना उपस्थित करत आहेत. आयडॉल (Institute of Distance and Open Learning- बहिःशाल आणि मुक्त शिक्षण विभाग) ने नुकताच एफवायबीए परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये 5090 विद्यार्थ्यांपैकी 236 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहे. यातील 213 विद्यार्थ्यांना एका विषयात भोपळा मिळाला, तर 18 विद्यार्थ्यांना दोन विषयांत, चौघा विद्यार्थ्यांना तीन विषयांत शून्य गुण आहेत. तर एका विद्यार्थ्याला चार विषयांमध्ये एकही गुण मिळवता आलेला नाही. एफवायबीए परीक्षेत 29 विषयांची परीक्षा घेण्यात आली. यातील अनेक विषय असेही आहेत ज्यात एकही विद्यार्थी नापास झाला नाही, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत अशी माहिती आयडॉल विभागाकडून देण्यात आली. शिवाय, जर विद्यार्थी निकालाबाबत समाधानी नसतील, तर त्यांनी पुनर्मूल्यांकन करावं, असं आयडॉलकडून सांगण्यात आलं आहे. आधीच यूजीसीच्या मान्यता यादीत नसल्याने आयडॉलवर टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं असताना असे निकाल देऊन विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचं स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांचं म्हणणं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून पेपर पुनर्तपासणीचे पैसे न घेता ही समस्या सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थी संघटनांनी दिला आहे
आणखी वाचा























