Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून 'या' प्रकरणात गुन्हा दाखल होणार?
Sanjay Raut : स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून एफआयआर दाखल होणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.
Sanjay Raut : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांकडूनही राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांनी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना धमकी आणि शिविगाळ होत असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यातील आवाज हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा असल्याची चर्चा होती. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, स्वप्ना पाटकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेत स्वप्ना पाटकर यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती.
पोलिसांनी ऑडिओ क्लिप प्रकरणात तपास सुरू केल्यानंतर आज भाजपचे माजी खासदार वाकोला पोलीस ठाण्यात पुन्हा धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. स्वप्ना पाटकर यांना फोनवरून देण्यात आलेली धमकी, पत्राद्वारे देण्यात आलेली धमकी, आदींबाबत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. आज संध्याकाळपर्यंत वाकोला पोलीस स्वप्न पाटकर धमकी प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.
स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत काय म्हटले?
मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची चौकशी देखील झाली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात दिलेला जबाब मागे घ्यावा यासाठी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव घेतले असल्याचे सांगण्यात यावे. ही धमकी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने असावी असेही पाटकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. धमकी देणाऱ्यांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात असून मोबाइलही हिसकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी म्हटले. मागील अनेक दिवसांपासून धमकी मिळत असून मानसिक त्रासही दिला जात असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. माझा मोबाइल क्रमांक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी लिहिला आहे. घरी येणाऱ्या वृत्तपत्रातून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे पाटकर यांनी सांगितले.