Mumbai Unlock : मुंबईत सायंकाळी 5 वाजल्यानंतर जमावबंदी आणि संचारबंदी कायम: महापौर किशोरी पेडणेकर
नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली असली तरीही नागरिकांना सतर्क राहतण्याचं आवाहन
Mumbai Unlock : कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊननंतर राज्यात बऱ्याच दिवसांनंतर अनलॉकचे नियम सुरु झाले. या नियमांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक शहरांमध्ये दुकानं सुरुही करण्यात आली. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली असली तरीही नागरिकांना सतर्क राहतण्याचं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी केलं.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक स्पष्ट केल्या. दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली असली तरीही दुकानांतील कामगार 4 वाजेपर्यंतच काम करतील. सायंकाळी 5 वाजल्याच्यानंतर शहरात जमावबंदी आणि संचारबंदी सुरुच असेल. याशिवाय सलून, पार्लर आणि स्पा दुपारी 4 वाजेपर्यंत एसीचा वापर न करता सुरु राहतील. या ठिकाणी एसी सुरु असल्याचं निदर्शनास आल्यास सदर आस्थापनाच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.
मुंबईतील प्रवासाबाबत काय म्हणाल्या महापौर ?
मुंबईच्या लोकल वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु राहतील. तर बीएसटी बसने मात्र प्रवास करण्याची मुभा नागरिकांना असेल. बीएसटी बसमध्ये फक्त बैठकव्यवस्थेइतकीच प्रवासी संख्या असणार आहे. तर, उभ राहून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे हे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. कार्गो वाहनांतील प्रवास हा तीन व्यक्तींपुरताच मर्यादित ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आंतरजिल्हा वाहतुकीसाठी पाचव्या स्तरातून येणाऱ्या वाहनांस प्रवासाची परवानगी नाही ही बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
Coronavirus India: तब्बल 61 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद; जाणून घ्या नेमका आकडा
लॉकडाऊनकडून अनलॉककडे जाताना...
'लॉकडाऊनच्या नंतर अनलॉकच्या मार्गानं जात असताना काही नियमांचं पालन केलं जाणं गरजेचं आहे. नागरिकांनी इथं सहकार्य करत स्वयंशिस्तीचं पालन करणं अपेक्षित आहे. तरच लॉकडाऊन पूर्णपणे उघडेल आणि परिस्थिती पूर्ववत होईल. कारण, कोविडचं संकट अद्यापही संपलेलं नाही, आपण ते संपुष्टात आणण्याच्या नजीक जात आहोत. पण, त्याआधी जी काळजी घ्यायची आहे ती घेतलीच पाहिजे. यासाठी मास्कचा वापर करणं, हात धुणं, गर्दी टाळणं या नियमांचं पालन केलं जाणं गरजेचं आहे' असं महापौर म्हणाल्या.
लोकल बंद असल्यामुळे बीएसटीवर ताण
महाराष्ट्रात कोरोना अनलॉकच्या पार्श्वभूमीवर पाच स्तर तयार करण्यात आल्याचं सांगत एसटीच्या प्रवासाला परवानगी दिल्यास पाचव्या स्तरातील ठिकाणहून एसटी आली, तर त्या सुरक्षित भागाला बाधित करु शकतात. एसटी पूर्ण महाराष्ट्रात फिरते. पण, बीएसटी मात्र नवी मुंबई आणि पनवेलपर्यंत जाते, त्यामुळंच सध्या याबाबत अधिक खबरदारी घेतली जात आहे असून, मुंबईत राहून मुंबईच्या लोकांना सुरक्षित ठेवण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय सर्वच महानगरपालिकांनी एकमेकांना सांभाळून घेतल्यास जिल्हा, तालुका आणि शहरांमध्ये कोरोनाला थोपवता येईल असं आवाहनही त्यांनी केलं.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असली तरीही आपण मात्र ही तिसरी लाट येऊच नये यासाठी काळजी घेत असल्याचं सांगत त्यांनी यावेळी विरोधकांनाही नालेसफाईच्या मुद्द्यावरुन स्पष्ट उत्तर दिलं. नालेसफाईवरून विरोधकांनी विरोधकांनी चांगलेच आरोप केले आहेत. शिवाय आपणही अधिकाऱ्यांची बैठक बोलावलीच आहे त्यामुळे सदर प्रकरणी कोणी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणारच, असं त्या म्हणाल्या.
मान्सूनच्या धर्तीवर पालिका प्रशासन सज्ज
मान्सूनपर्व तयारीसाठी साथीच्या आजारांचे उपचार, औषधं, चाचण्या करण्यासाठीची खबरदारी, त्यासाठीच्या सूचना, पाणी साचणाऱ्या ठिकाणांमध्ये औषध फवारणी ही सर्व व्यवस्था करण्यात येत असल्याचं महापौरांनी सांगितलं. नागरिकांनी या काळात सतर्कता बाळगत आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी शेवटी केलं.