Mumbai Crime :अंधेरीतील ओशिवरा परिसरात इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
Crime News : मुंबईतील अंधेरी भागात एका इमारतीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सेफ्टी टँकमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे अंधेरीतील ओशिवरा परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Mumbai Crime News : मुंबईतील अंधेरीमधील (Andheri) ओशिवरा परिसरात इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये (Safety Tank) एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे अंधेरीमधील ओशिवरा परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्यक्तीच्या शरीरावर गंभीर जखमा देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन नागरिकांना पोलिसांकडून करण्यात येत आहे.
एसव्हीएस रोड जोगेश्वरी येथील प्लॉट नंबर 4 मध्ये पोलिसांना या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या इमारतीचे बांधकाम लेबरकॅम्प येथे सुरु होते. त्या इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. अद्याप तरी या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तर मृत्यू झालेली ही व्यक्ती अंदाजे 40 ते 50 वर्षांची असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून यासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.
सेफ्टी टँकमध्ये विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला
दरम्यान या मृतदेहाच्या दंडावर आणि हातावर गंभीर जखमा असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे या व्यक्तीची हत्या करुन त्याचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह सेफ्टी टँकमध्ये टाकल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी सध्या त्याच मार्गाने तपास सुरु केला आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी जरी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जरी असला तरी लवकरच मारेकरी सापडला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा मृतदेह इमारतीमध्ये कामाला येणाऱ्या एका प्लबंरला आढळून आला. सेफ्टी टँकमध्ये जवळपास बारा फूट खोल पाण्यात विवस्त्र अवस्थेमध्ये हा मृतदेह होता.
पोलिसांकडून तपास सुरु
याप्रकरणी सात ते आठ पोलीस पथके काम करत असल्याची माहिती देण्यात येत आहे. तर पोलिसांकडून स्थानिकांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच मागील दोन ते तीन दिवसांपासून आणखी कोणी या भागातील बेपत्ता आहे का हे शोधण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हे बांधकाम सुरु असणाऱ्या साईटवरील कामगारांची चौकशी सुरु असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील तपासात पोलिसांच्या हाती काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.