Jaipur Express Firing : ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना स्वयंचलित गन मिळणार नाही, जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Jaipur Express Firing : ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे मिळणार नाहीत. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Jaipur Express Firing : ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे (Automatic Gun) मिळणार नाहीत. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारानंतर (Jaipur Express Firing) खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अखेरचा निर्णय आणि सर्क्युलर रेल्वे बोर्डाकडून येणं बाकी आहे. 31 जुलैला मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF जवान चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात (Firing) चौघांचा मृत्यू झाला होता. चेतन सिंहने AR-M1 रायफलने चौघांची हत्या केली होती.
कर्मचाऱ्यांना हलकी हत्यारे देण्याचा निर्णय
मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारच्या घटनेनंतर आता सेंट्रल आणि वेस्ट रेल्वेने ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना AK47 किंवा AR गन यांसारखे स्वयंचलित हत्यारे देण्याऐवजी हलकी हत्यारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेकडून हा निर्णय सध्या विभागीय सुरक्षा आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. परंतु यावर अखेरचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार असून त्यानंतर सर्क्युलर जारी होईल.
संवेदनशील ठिकाणी आवश्यकतेनुसार डिप्लॉयमेंट
परंतु आता सामन्य मार्गावरील ट्रेनमध्ये कर्मचाऱ्यांकडे अशी ऑटोमॅटिक हत्यारं नसतील. मात्र जे संवेदनशील ठिकाणं आहे, जिथे नक्षलवादी किंवा इतर प्रकारच्या गुन्हेगारांद्वारे ट्रेनला लक्ष्य केलं जाण्याची शंका असते तिथल्या मार्गांवर आवश्यकतेनुसार डिप्लॉयमेंट असेल.
चेतन सिंहच्या सहकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार
दुसरीकडे ट्रेनमधील गोळीबार प्रकरणात आरोपी आरपीएफ शिपाई चेतन सिंह याच्यासोबत उपस्थित असलेल्या दोन आरपीएफ जवानांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार चेतनने गोळीबार केल्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी घाबरुन स्वत:ला टॉयलेटमध्ये बंद करुन घेतलं होतं,
तर RPF सूत्रांच्या माहितीनुसार, चेतनने आपल्या आजाराबद्दल विभागाला कोणतीही माहिती दिली. त्याच्यावर मानसिक आजाराबाबत उपचार सुरु असल्याची माहितीही त्याने दिली नव्हती.
एकामागोमाग चार जणांचा जीव घेतला
आरपीएफ शिपाई चेतन सिंहने त्याचे वरिष्ठ असलेल्या एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांना गोळ्या घालून जीव घेतला. बी-5 कोचमध्ये टिकाराम मीणा, बी-4 कोचमधील मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला, पँट्री कारमध्ये असलेल्या सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांचीएकामागोमाग हत्या केली. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकाजवळ प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. यावेळी आरोपीने खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जीआरपीने त्याला पकडलं.
त्या रात्री कोण कोण होते ड्युटीवर?
मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये त्या रात्री ASI टिकाराम मीणा (वय 58 वर्षे), पोलीस हवालदार नरेंद्र परमार (वय 58 वर्षे), शिपाई अमेय आचार्य (वय 26 वर्षे) आणि शिपाई चेतन सिंह (वय 33 वर्षे) ड्युटीवर होते. या सर्वांची 28 जुलैपासून एक आठवड्याभर मेल पॅसेन्जर गाड्यांवर एस्कॉर्टिंग करण्याची ड्युटी नेमलेली होती. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान सौराष्ट्र मेल या ट्रेनमधून हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी एक्सॉर्ट करत सूरतपर्यंत गेले आणि सूरतवरुन जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने एक्सॉर्ट करत मुंबईला येत होते तेव्हा हा प्रकार घडला.
हेही वाचा