Rohit Pawar: ठाकरे-फडणवीस भेटीवर रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्याने मनसेचा संताप; म्हणाले, 'तुमचा एक पाय मविआत दुसरा महायुतीत'
Rohit Pawar: राज ठाकरे यांचे नाव खराब होईल असं रोहित पवार यांनी म्हटलं होते, त्यावरती आता मनसेचे प्रवक्ते खैरे यांनी पवारांना उत्तर देत राज ठाकरेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही, असा खोचक सल्ला दिला आहे.

मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घडामोडीची शक्यता आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि शिवसेना एकत्रित येणार अशा चर्चा सुरू होत्या. अशातच शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटासह मनसे पक्षातील नेत्यांनीही एकत्रिकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आज सकाळी(गुरूवारी,ता-12) मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांची ताज लँड्स हॉटेलमध्ये जवळपास एत तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ठाकरे बंधू एकत्र येणार असे सामान्य लोकांमध्ये वातावरण निर्मिती झाली असताना राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना (devendra Fadnavis) भेटत असतील तर मनसेने वाटाघाटी करण्यासाठी ते ती वातावरण निर्मिती झाली होती का? असा सवाल निर्माण होईल व राज ठाकरे यांचे नाव खराब होईल असं रोहित पवार यांनी म्हटलं होते, त्यावरती आता मनसेचे प्रवक्ता आणि सचिव योगेश खैरे यांनी रोहित पवारांना उत्तर देत राज ठाकरेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही, असा खोचक सल्ला दिला आहे.
ह्याचा परिणाम तुमच्या नेत्यांच्या प्रतिमेवर होत नाही का?
योगेश खैरे यांनी रोहित पवारांच्या प्रतिक्रियेवर सोशल मिडियावरती उत्तर दिलं आहे. खैरे यांनी आपल्या पोस्टमध्ये, "रोहित पवारांनी (@RRPSpeaks) राजसाहेब ठाकरेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भाजपसोबत सत्तेत आहे. राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सोबत एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याबाबतच्या शक्यता तुम्ही फेटाळत नाही. म्हणजे एक पाय महाविकास आघाडीत आणि दुसरा महायुतीत अशी तुमची वाटचाल सुरु आहे. मग ह्याचा परिणाम तुमच्या नेत्यांच्या प्रतिमेवर होत नाही का ? ह्या एकत्रीकरणाच्या चर्चेचा वापर पक्षातून लोकं बाहेर पडू नये किंवा शिवसेना (उबाठा) पक्षावर दबाव आणण्यासाठी तर तुम्ही करत नाहीत ना ? अशा चर्चा लोकांमधे, माध्यमांमधे सुरु आहेत. त्यावर रोहित पवार ह्यांनी लक्ष दिलं तर बरं होईल."
रोहित पवारांनी (@RRPSpeaks) राजसाहेब ठाकरेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भाजपसोबत सत्तेत आहे. राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सोबत एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याबाबतच्या शक्यता तुम्ही फेटाळत नाही. म्हणजे एक पाय महाविकास…
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) June 12, 2025
रोहित पवार काय म्हणाले होते?
राज ठाकरे भाजपच्या नेत्यांना भेटत असतील तर असं म्हणायचं का, ज्या काही सामान्य लोकांच्या भावना काही प्रमाणात ठाकरेंच्या बाजूने झाल्या होत्या, चांगलं वातावरण निर्माण झालं होते, अशातच राज ठाकरे भाजपला जाऊन भेटत असतील तर चर्चा करत असतील तर लोक चर्चा करायला सुरूवात करतील हे फक्त वातावरण तयार केलं गेलं. त्या वातावरणाचा फायदा मनसेने कुठे वाटाघाटी करायला केला का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेंसारखा मोठा नेता, त्याचं नाव कुठेतरी खराब होऊ शकतं, असं रोहित पवारांनी म्हटलं होतं.
राज ठाकरे फडणवीस भेट
राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी ताज लँड्स हॉटेलमध्ये पोहोचले, आणि अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्याने, यामागे राजकीय रणनीती असल्याचं संकेत मिळू लागले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 10.35 मिनीटांनी फडणवीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि पुन्हा 11.35 ला बाहेर पडले.
























