मोठी बातमी ! म्हाडाचा दिवाळीपूर्वीच धमाका; मुंबईत 5000 घरांची लॉटरी निघणार; उपाध्यक्षांची घोषणा
संजीव जयस्वाल यांनी म्हाडा, सिडकोसह इतर मंडळांबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. म्हाडाच्यावतीने 5 हजार घरांची लॉटरी काढण्याची घोषणा त्यांनी केली.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) घर खरेदी करणाऱ्यांसाठी म्हाडाने आनंदाची बातमी दिली असून यंदाच्या वर्षात देखील दिवाळीपूर्वीच मोठी लॉटरी काढली जाणार आहे. मुंबईत म्हाडाकडून (Mhada) जवळपास 5 हजार घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, बीडीडी चाळ पुनर्विकासातील काही घरांच्या (Home) चावीचे वाटप देखील मे महिन्यात केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. त्यामुळे, बीडीडी चाळीतील पुनर्वसन नागरिकांनाही आता लवकरच घराच्या चाव्या मिळणार आहेत. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पातही म्हाडाने पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात 19,497 घरं बांधणीचं उद्दिष्ट ठेवलं असून मुंबईत 5199 घरं बांधली जाणार आहेत. आता, दिवाळीपूर्वीच ही लॉटरी निघेल असे संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
संजीव जयस्वाल यांनी म्हाडा, सिडकोसह इतर मंडळांच्या कामकाजाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी, म्हाडाच्यावतीने 5 हजार घरांची लॉटरी काढण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच, इतर मंडळांची मुंबईतील घरं पडून आहेत, साधारण मी रुजू झालो तेव्हा 19 हजार घरं रिक्त होती, आता 12 हजार 500 घरं पडून आहेत. म्हणजे 7 ते 7.5 हजार घरं गेली आहेत. आपण डिस्काऊंट देतोय, योजना करतोय आणि रेंटल हाऊसिंग द्वारे प्रस्ताव देतोय. ज्यामुळे इतर मंडळाची घरं जातील असं नियोजन आपण करतोय, अशी माहितीही जयस्वाल यांनी दिली. पुढील एक दीड वर्षात ही घरं 90 टक्के जातील असं नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत 5199 घरं, अर्थसंकल्पात तरतूद
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन 2025-2026 च्या अर्थसंकल्पात 'म्हाडा'च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 19 हजार 497 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात 9202.76 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात 5199 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन 2025-2026 च्या अर्थसंकल्पात 5749.49 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण मंडळाअंतर्गत 9902 सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट असून सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात त्यासाठी 1408.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाचा सन 2024-25 चा सुधारित व सन 2025-2026 चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन 2025-2026 च्या 15951.23 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन 2024-25 च्या 10901.07 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
























