आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार, मुंबईत 'मातोश्री'वर मशाल मोर्चा, पंढरपुरातून आक्रोश मोर्चा!
आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मुंबईत मुख्यमंत्र्याच्या मातोश्री या निवासस्थानावर प्रतिकात्मक मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. तर पंढरपुरातून आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे.
मुंबई : आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चा प्रतिकात्मक मशाली घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजेच मातोश्रीवर धडकणार आहे. संध्याकाळी पाच वाजता वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पंढरपुरात मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाल सुरुवात होणार आहे. या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही. पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. या दोन्ही मोर्चांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा ठोक मोर्चाच्यावतीने आज पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, पंढरपुरातून पायी चालत मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. तर पंढरपुरच्या दिशेने येणारी एसटी वाहतूकही थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुमारे 500 पोलीस तैनात असून ड्रोनद्वारे हालचालींवर नजर ठेवली जाईल. दुपारी एक वाजता नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. प्रशासनासोबत काल (6 नोव्हेंबर) रात्री उशिरा झालेल्या चर्चेतून एक प्रस्ताव तयार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार मोजक्या 10 ते 15 आंदोलकांना नामदेव पायरीचे दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पायी आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल
आज 'मातोश्री'वर मशाल मोर्चा मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या 'मातोश्री'पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चावेळी खऱ्या मशाली आणू नका. या मोर्चासाठी प्रतिकात्मक मशालींचा वापर केला जाईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, ज्या मुलांची नोकरीसाठी निवड झाली आहे परंतु आरक्षणाच्या निर्णयामुळे प्रक्रिया रखडली आहे, यांच्याबाबतीत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्या आशा विविध मागण्या असणार आहेत. आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई समन्वयक राजन घाग यांनी ही माहिती दिली.
आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस : विनायक मेटे दरम्यान, 'मातोश्री'वरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून सरकारकडून दडपशाही सुरु असल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी केला आहे. पूर्वीच्या मातोश्रीवर सर्वांना येण्यास परवानगी होती आता मात्र 'मातोश्री'वर येऊ देत नाहीत. अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा यासाठी आजचा मोर्चा होणारच. त्यासाठी आम्हाला अटक झाली तरी हरकत नाही पण आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.