एक्स्प्लोर
पत्नीशी मोबाईलवर बोलताना ओरडणाऱ्या शेजाऱ्याची हत्या
डोक्यात लाकडी बॅटने जोरदार फटका मारुन तरुणाने शेजाऱ्याचा जीव घेतला.
भिवंडी : पत्नीशी मोबाईलवर बोलताना मोठमोठ्याने हाका मारुन बोलण्यात अडथळा आणल्याच्या रागातून पतीने शेजाऱ्याची हत्या केली. डोक्यात लाकडी बॅटने जोरदार फटका मारुन शेजाऱ्याचा जीव घेण्यात आला. ही घटना भिवंडी शहरातील कैलासनगर परिसरात घडली आहे.
नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय आरोपी आशिषकुमार दयाराम जयसवारला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेत संजय राठोड या शेजाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले.
संजय हा भिवंडी शहरातील कैलासनगरमध्ये आपल्या परिवारासह एका खोलीत राहत होता. तर त्याच्या शेजारी आरोपी आशिषकुमारही राहतो. दुपारच्या सुमारास आशिषकुमार पत्नीसोबत मोबाईलवर बोलत होता, त्याचवेळी संजय ओळखीच्या एका नऊ महिन्यांच्या मुलाला जोरजोराने हाका मारत होता.
संजयच्या आरडाओरड्यामुळे पत्नीशी मोबाईलवर बोलताना आशिषकुमारला अडथळा येत होता. त्यामुळे त्याने संजया गप्प राहण्यास सांगितलं, मात्र तो ऐकत नसल्याचे पाहून आशिषकुमारला राग आला. त्याने रागाच्या भरात लाकडी बॅटने संजयला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करतानाच बॅटचा जोरदार फटका संजयच्या डोक्यात बसला. त्यामुळे संजय रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला.
आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला, तर संजयला जखमी अवस्थेत उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संजयची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या जबानीवरुन नारपोली पोलिस ठाण्यात आशिषकुमारवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नारपोली पोलिस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement