मुंबईत स्वबळावर लढणारी काँग्रेस नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडीबरोबर जाणार
मुंबईत स्वबळावर लढणारी काँग्रेस नवी मुंबईत माञ महाविकास आघाडीबरोबर जाणार आहे. महाविकास आघाडीने विभागवार कार्यकर्ता मेळावे घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
नवी मुंबई : काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला असला तरी नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडी बरोबर महानगरपालिका निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. पुढील दोन महिन्यात महानगरपालिका निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीने विभागवार कार्यकर्ता मेळावा घेत रणशिंग फुंकले आहे. नवी मुंबईत गेल्या 25 वर्षांपासून मनपावर असलेली गणेश नाईकांची एकहाती सत्ता उलथवून टाकण्याचा चंग यावेळी तीन पक्षांनी एकत्र येवून केला आहे.
कोरानामुळे एप्रिल महिन्यात होणारी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने पुढील दोन महिन्यात राज्यातील 5 महानगरापालिका निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश असल्याने सद्या राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. 2022 मध्ये होणारी मुंबई मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असली तरी नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडी बरोबर जाण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. यासाठी महाविकास आघाडीने विभागवार मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून नवी मुंबई मनपात गणेश नाईक यांची असलेली एकहाती सत्ता यावेळी धुळीस मिळवणार असल्याचे आवाहन काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपला दिले आहे.
महाविकास आघाडी एकत्र लढणार तीन पक्षांच्या समन्वयकाची जबाबदारी शिवसेनेने आपल्या खांद्यावर घेतली आहे. नवी मुंबईत एकेकाळी शिवसेनेचा भगवा मनपावर फडकत होता. मात्र, गणेश नाईकांनी सेनेला सोडचिट्टी दिल्यानंतर गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना सत्तेबाहेर आहे. याची सल असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर घेवून यावेळी सत्ता आणायचीच असा चंग शिवसेना नेत्यांनी केला आहे. वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने केलेली चांगली कामे लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न तीन पक्ष करणार असल्याचे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी स्पष्ट केले.
..तर आपलीच सत्ता येणार असल्याचा भाजप आमदार गणेश नाईक यांचा दावा
महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र लढत असले तरी कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही. सिटवाटप फॉर्मूला नक्की झाला असून बंडखोरीला वाव नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने कार्यकर्ता मेळावे घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले असले तरी भाजप दरबारी मात्र शांतता आहे. नागरी प्रश्नांना घेवून आयुक्तांच्या दरबारात जाण्याचा एकमेव अजेंडा भाजप राबवत आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षाबरोबर चौथा पक्ष येवून आपल्या समोर लढले तरी आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा भाजप आमदार गणेश नाईक करीत आहेत.
महाविकास आघाडी सिट वाटप फॉर्मूला
- एकूण सिट - 111
- शिवसेना – 65 ते 70
- काँग्रेस – 22 ते 24
- राष्ट्रवादी – 20 ते 22
2015 निवडणुकीत जिंकलेले पक्षीय बलाबल :
- एकूण नगरसेवक – 111
- राष्ट्रवादी काँग्रेस + अपक्ष – 57
- शिवसेना – 38
- काँग्रेस – 10
- भाजपा – 6
पक्षांतरानंतर सद्या असलेली पक्षीय नगरसेवक संख्या :
- भाजप – 61
- शिवसेना – 40
- काँग्रेस – 6
- राष्ट्रवादी काँग्रेस - 4