Andheri Bypoll Election : ऋतुजा लटकेंविरोधात बुधवारी लाच मागितल्याची तक्रार दाखल; BMC च्या माहितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या
Andheri Bypoll Election : शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरोधात बुधवारी लाच स्वीकारल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Andheri Bypoll Elction : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या राजीनामा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ऋतुजा लटके यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असून त्यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेने हायकोर्टात दिली. विशेष म्हणजे ही तक्रार काल, बुधवारी 12 ऑक्टोबर 2022 रोजी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
ऋतुजा लटके यांनी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावेळी लटके यांच्या वकिलांनी राजकीय दबावात राजीनामा स्वीकारला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या वकिलांनी लटके यांचा युक्तिवाद फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. नियमांवनुसार, एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागले असे महापालिकेच्या वकिलांनी सांगितले. त्याशिवाय, लटके यांच्याविरोधाच चौकशी प्रलंबित असल्याची माहिती महापालिकेने हायकोर्टात दिली. यावर हायकोर्टाने तक्रारीची माहिती मागितली. लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि लाच मागितल्याची तक्रार असल्याचे मुंबई महापालिकेच्या वकिलांनी सांगितले. ही तक्रार बुधवारी, 12 ऑक्टोबर रोजी झाली असल्याची माहिती महापालिकेच्या वकिलांनी दिली. त्याशिवाय, लटके या कार्यालयातही गैरहजर असे, त्याबद्दलचीही त्यांची तक्रार प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान. ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. ऋतुजा लटके ज्या पदावर आहेत, त्यानुसार राजीनामा हा सहआयुक्तांकडून मंजूर होतो. निवडणूक लढवत असल्याने राजकीय दबावामुळे राजीनामा मंजूर केला जात नसल्याचे लटके यांच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितले. लटके यांच्या वकिलाने मुंबई महापालिकेच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावताना म्हटले की, नियमानुसार आमची प्रक्रिया योग्य आहे. याबाबतीतले आधीचे निकालही स्पष्ट आहेत. केवळ राजकीय दबावापोटी हे सारं रचण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. लटके यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारा तक्रारदार हा अंधेरी पश्चिम येथील असून वकील पनवेलचा असल्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्याशिवाय तक्रारीच्या पत्रावरील तारीखदेखील बदलण्यात आली असल्याचे लटके यांच्या वकिलांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: