Sanjay Raut : शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत
Sanjay Raut On Maharashtra Political Crisis : शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, गुवाहाटीला गेलेले आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut On Maharashtra Political Crisis : शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, गुवाहाटीला गेलेले आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जे सकाळी झालं होतं ते आता सायंकाळी होईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. पक्षविस्तारासाठी आमच्याकडे मोठी संधी आहे. आजची कार्यकारिणीची बैठक देशाच्या राजकारणाला दिशा देणारी आहे. अनेक नियुक्त्या केल्या जातील, असं ते म्हणाले. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. काल आमच्या बैठकीत शिंदे गटातील दहा आमदारांशी बोलणं झालं, ते मुंबईत आले की आमच्याकडे येतील, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी म्हटलं की, ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी? स्वत:ला वाघ म्हणवता मग बकरीसारखे का पळता? असा टोलाही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. या पळून गेलेल्या आमदारांवर 11 कोटी जनतेचा अविश्वास आहे, असंही ते म्हणाले.
मी देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतो की तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झालं ना ते आता सायंकाळी होईल, फडणवीसांनी या झमेल्यात पडू नये. भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसेल. ते विरोधी पक्षनेते आहेत. जरी ते आमचे राजकीय विरोधक असले तरी तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही मध्ये पडू नका, असा सल्ला संजय राऊतांनी फडणवीसांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी सांगितलं की, राष्ट्रीय कार्यकारिणी कोणत्याही पक्षासाठी फार महत्त्वाची असते. आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक निर्णय होतील. पक्षाच्या भवितव्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा होईल. काही नव्या नियुक्त्या होतील. राष्ट्रवादी आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठिशी मजबुतीनं उभे आहेत. आजची राष्ट्रीय कार्यकारिणी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाला दिशा देणारी असेल, असं ते म्हणाले.