(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Chavan : एकनाथ शिंदेंचे मित्र अन् फडणवीसांची जवळीक; रविंद्र चव्हाण कॅबिनेटमध्ये, राजकीय प्रवास जाणून घ्या...
Ravindra Chavan : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत रवींद्र चव्हाण सावलीसारखे होते. चव्हाण हे फडणवीस यांचे निकटवर्तीय असून चव्हाण यांच्यावर ही मोठी जबाबदारी त्यांनी सोपविली होती
Maharashtra Cabinet Expansion : राज्याच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज 40 व्या दिवशी विस्तार झाला आहे. 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. या मंत्रिमंडळात बहुतांश जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची देखील वर्णी लागली आहे. चव्हाण हे फडणवीसांच्या सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. आज त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
रविंद्र चव्हाण यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊयात...
2002 साली भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली.
2005 साली डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले.
2007 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदावर विराजमान
नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघ आमदार
2009, 2014 व त्यानंतर 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले
2016 साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या 4 खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यामध्ये बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून युतीच्या काळात कार्यरत होते.
त्याचप्रमाणे रायगड व पालघर पालकमंत्री जबाबदारी पाहिली
राज्यात भाजप शिवसेना युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आले.
आमदार असतानाच त्यांची 2020 साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक झाली.
संघटनात्मक जबाबदारी असताना कोकण पट्ट्यात भाजप रुजविण्यात आणि वाढविण्यात महत्वाची भूमिका
शिवसेना मनसेचा झंझावात असतानाही कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा चेहरा म्हणून ओळख प्राप्त
एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांचे मैत्रीचे संबंध
भाजपा शिवसेना युतीच्या काळात विधानसभा, लोकसभा निवडणूक आणि महापालिका निवडणूकीत एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांनी मैत्रीचे संबंध जपत एकमेकांना साथ दिली आहे. निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढली असतानाही शिंदे आणि चव्हाण यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे आमदार चव्हाण यांना डोंबिवलीतील शिवसैनिकांचा छुपा पाठिंबा राहीला आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आगामी निवडणुका लक्षात घेता शिवसेनेने आमदार चव्हाण यांच्याविरोधी भूमिका घेत विकास कामावरुन त्यांना लक्ष केले होते. मात्र तरीही चव्हाण हे शिंदे यांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेत नसायचे. सूचक विधान करत ते वेळ मारुन नेत असत. थेट शिंदेवर प्रतिक्रिया का देत नाहीत असे प्रसार माध्यमांनी विचारताच ते शिंदे हे आमचेच असल्याचे हसून सांगत असत. या घडामोडी लक्षात घेता डोंबिवलीचे भाजपाचे आमदार चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले असून शिंदे यांना भाजपाकडे वळविण्यात चव्हाण यांचाही मोठा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत रवींद्र चव्हाण सावलीसारखे होते. त्यामुळे शिंदे - चव्हाण मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा दिसून आले. आमदार चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून चव्हाण यांच्यावर ही मोठी जबाबदारी त्यांनी सोपविली होती. चव्हाण यांनी ही जबाबदारी चोखपणे पार पाडल्याने आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.