CM Uddhav Thackeray | माझी थट्टा करा, जनतेच्या जीवाशी खेळ करु नका; 'मी जबाबदार' मोहिमेवरुन भाजपच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
मला वाईट म्हटलं तरी चालेल मी वाईटपणा घेईन. माझी थट्टा करा, जनतेच्या जीवाशी खेळ करु नका. मी जबाबदार ही मोहीम हे उघड ते उघडा त्यांच्यासाठी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मुंबई : "मी जबाबदार ही मोहीम हे उघड ते उघडा त्यांच्यासाठी आहे. मला वाईट म्हटलं तरी चालेल मी वाईटपणा घेईन. माझी थट्टा करा, जनतेच्या जीवाशी खेळ करु नका. पण एका वर्गासाठी समाज धोक्यात घातला तर तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणू सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ओळखत नाही," अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चेदरम्यान विरोधकांनी मी जबाबदार मोहिमेवरुन सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याला कधी कोपरखळी मारत, टोला लगावत किंवा सज्जड दम भरत उत्तर दिलं.
विरोधकांचा थटथयाट पाहून मला नटसम्राट आठवला, अशी टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोपरखळी मारली. कोरोना म्हणतो की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...कोरोना हा विषाणू आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील एकही कोरोना रुग्ण लपवलेला नाही किंवा एका रुग्णाचाही मृत्यू लपवलेला नाही. सरकार आवश्यक ती खबरदारी घेत आहे. देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर आपण सुरु केलं. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशा सुविधा नव्हत्या, त्या वाढवल्या, असं म्हणत त्यांनी भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळाले. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत महसूल, आरोग्याचे कर्मचारी राज्यात घरोघर गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले. सरकार खबरदारी घेत आहे. देशात जगात पहिले जम्बो हॉस्पिटल आपण उभे केले. किती जणांना उपचार दिले ही माहिती ही आपल्याकडे आहे.
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरुनही भाजपने टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करु नये हे सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. रुग्ण संख्या वाढत आहेत आज. काय करायचे काही नाही. दुर्देवाने थोडे इकडे तिकडे झाले आणि मी पुन्हा येईन म्हणत व्हायरस परत आला.
हिंदुत्त्व शिकवू नका, तुमची पात्रता नाही "बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढली. त्यांना विसरला नाहीत. धन्यवाद. पण त्यांचे हिंदुत्व तरी विसरु नका. बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले. बाळासाहेब राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला अभिमान आहे आणि हे म्हणाले आम्ही नाही पाडले. राम मंदिरासाठी आता घरोघर पैसे मागता. पण नाव मात्र आमचे राहिले पाहिजे हा आग्रह. काश्मीर पंडित निर्वासित होऊन जगत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मिरी पंडितांना हक्काचे स्थान मिळाले. आमचे हिंदुत्व काढत असताना काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांबरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व. हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तुम्ही त्याला पात्र नाही," असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. बाळासाहेबांच्या खोलीत झालेली चर्चा कशी विसरलात? "बाळासाहेबांच्या खोलीत बंद दरवाजाआड पुढच्या वाटचालीची चर्चा केली, तेव्हा देवेंद्र तरी निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता, हे तुमचे हिंदुत्त्व. 2014 मध्ये युती तुम्ही तोडली, तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आज ही आहोत, उद्या ही राहू," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विदर्भ वेगळा होणार नाही : मुख्यमंत्री विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. माझं आजोळ मी विसरलो नाही. माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याचा तुमचा विचार मनातून काढून टाका, असं मुख्यमंत्री म्हणाले.महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
