(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CNG Price Hike: मुंबईत सीएनजी दरवाढीचा भडका; प्रतिकिलो सीएनजीसाठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये
CNG Gas Price Hike : सीएनजी गॅसच्या दरात महानगर गॅसने दरवाढ केली आहे. प्रति किलो चार रुपये दरवाढ केली आहे.
CNG Gas Price Hike : पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे 4 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅसच्या प्रति किलोसाठी 76 रुपये मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेड हा मुंबई, ठाणे आणि परिसरात प्रमुख गॅस वितरक आहे. ही दरवाढ आज पहाटेपासून लागू झाली आहे.
केंद्र सरकारने एक एप्रिलपासून नैसर्गिक वायूच्या किंमतीत 110 टक्के वाढ केली. त्यामुळे महानगर गॅसला गॅस खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कंपनीकडून खरेदी आणि विक्री खर्चातील ताळमेळ साधण्यासाठी टप्प्याटप्याने दरवाढ केली जात आहे. मुंबई आणि परिसरात आज पहाटेपासून सीएनजीसाठी प्रतिकिलो 76 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, दुसरीकडे घरगुती ग्राहकांना महानगर गॅसने दिलासा दिला आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसच्या दरात कोणतीही दरवाढ केली नाही.
नाशिकमध्ये सीएनजीचा दर 80 रुपयांवर
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनेही सीएनजीच्या दरात वाढ केली. 26 एप्रिल रोजी झालेल्या दरवाढीनंतर नाशिकमध्ये आता सीएनजीचे दर प्रति किलो 80 रुपये झाले आहेत. नाशिकमध्ये एकाच महिन्यात सीएनजीचा दर 65.25 रुपयांवरून 80 रुपये झाला आहे. नाशिकमध्ये सीएनजीचा दर 1 एप्रिल 2022 रोजी 65.25 रुपये किलो होता. त्यानंतर 6 एप्रिल रोजी झालेल्या दरवाढीनंतर हा दर 71 रुपयांवर पोहचला. त्यानंतर 13 एप्रिल, 20 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी दरवाढ करण्यात आली.
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. मुंबई पेट्रोलचा दर 120.51 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर इतका आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: