लॉकडाऊनमुळे ओस पडलेला मुंबईतील बूक स्ट्रीट वाचकांच्या प्रतीक्षेत
गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे हा व्यवसाय बंद करून विक्रेत्यांना आपल्या घरी बसावं लागलं. इतर व्यवसायाप्रमाणे या व्यवसायातही मोठी अडचण निर्माण झाली आणि या व्यवसायिकांना गेली सहा महिने अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं.
मुंबई : मुंबईच्या वैशिष्ट्यांमध्ये भर पाडणाऱ्या आणि वाचकांसाठी नेहमीच पर्वणीच ठरणाऱ्या बुक स्ट्रीटवर सध्या शुकशुकाट जाणवत आहे. कोरोनामुळे बंद पडलेला हा मार्ग हळूहळू सुरू जरी होत असला तरीही वाचकांनी बुक स्ट्रीटकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुस्तक विक्री करून आपली उपजीविका भागवणाऱ्या हे विक्रेते मात्र अडचणीत आलेले आहेत.
मुंबईतील फाऊंटन परिसरात वर्षोनुवर्षे तग धरून असणारा बुक स्ट्रीट हा मुंबईच्या वैशिष्ट्यामध्ये नक्कीच भर घालतो. कारण जगभरातील पुस्तकं वाचकांना या बुक स्ट्रीटवर अत्यंत कमी दराने उपलब्ध होत असल्याने या परिसरात वाचकांची मोठी गर्दी असते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हा बुक स्ट्रीट ओस पडलेला आहे. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झाला आणि पुस्तक विक्रीचा व्यवसायही बंद पडला. सध्या इतर गोष्टी हळूहळू सुरळीत होत असताना देखील वाचक मात्र या परिसरात अजूनही फिरकलेले नाहीत. त्यामुळे तिथले विक्रेते वाचकांची वाट पाहत आहेत.
1965 सालापासून मुंबईतील फाउंटन परिसरात बुक स्ट्रीट सुरू झाले आहे. त्या काळातील महत्त्वाची जुनी पुस्तके रस्त्यावर मांडून विक्रीसाठी ठेवली जात होती. त्यावेळी मोजके पुस्तक विक्रेते हा व्यवसाय करत होते. इंग्रजी आणि हिंदी पुस्तकांची मागणी असायची. त्यानंतर या व्यवसायात पिढी बदलत गेली आणि हा व्यवसाय पुन्हा फुलू लागला. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेसह सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके, शालेय अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके आणि इतर वाङ्मय पुस्तक स्टॉल्समध्ये मिळू लागली. वाचकांनाही सेकंड हँड पुस्तक कमी दरात मिळू लागल्यामुळे या परिसरात वाचकांची दिवसभर गर्दी असते. सध्या या परिसरात नऊ बुक स्टॉल गेल्या अनेक वर्ष पुस्तक विक्रीचा व्यवसाय करत आहेत. रस्त्यावरच दुकान मांडून अतिशय विश्वासाने हा व्यवसाय कित्येक वर्ष सुरू आहे. पुस्तकांच्या विश्वात रमणारे वाचक दिवसभर या परिसरात घुटमळत असायचे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे हा व्यवसाय बंद करून विक्रेत्यांना आपल्या घरी बसावं लागलं. इतर व्यवसायाप्रमाणे या व्यवसायातही मोठी अडचण निर्माण झाली आणि या व्यवसायिकांना गेली सहा महिने अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं.
सध्या फाउंटन परिसरातील बुक स्ट्रीटवर नऊ पुस्तक विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत. फूटपाथवर खुल्या पद्धतीने विक्री करणाऱ्या या दुकानांमध्ये साधारण 10 ते 15 हजार पुस्तके असतात. आपल्याला हव्या असणाऱ्या प्रत्येक भाषेतील, प्रत्येक विषयातील पुस्तक या परिसरात मिळतात आणि या परिसरात येणे म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच असते. नेहमीच वाचकांनी गजबजलेल्या बुक स्ट्रीटवर सध्या शुकशुकाट आहे. पुस्तक विक्रेते वाचकांच्या पावलांकडे डोळे लावून बसलेले आहेत. मात्र वाचक या परिसरात येत नाहीत. लोकल बंद असल्यामुळे लोकांना बाहेर पडायला संधी नाही. पूर्णपणे कोरोना संकट दूर झालेलं नाही त्यामुळे वाचकांनीही बुक स्ट्रीटकडे पाठ फिरवली आहे. ज्याप्रमाणे इतर उद्योगधंद्यांना सरकारने मदत केली. त्याच पद्धतीने आम्हालाही सरकारने आर्थिक मदत करावी अशी माफक अपेक्षा या पुस्तक विक्रेत्यांनी शासनाकडे केली आहे.
40 वर्षाहून अधिक काळ आम्ही पारंपरिक पद्धतीने इथं पुस्तकांची विक्री करत आहोत. जगभरातल्या नामवंत लेखकांची आणि प्रकाशकांची पुस्तके वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. मात्र आमचा व्यवसाय हा फूटपाथवर खुल्या पद्धतीने आहे. भारतीय नागरिकांबरोबरच परदेशी वाचक देखील बुक स्ट्रीटवर येऊन एखादं पुस्तक नक्कीच चाळून जातात. त्यामुळे आम्ही नेहमीच समाधानी असतो. मात्र सध्या या व्यवसायावरही संकट आलेलं आहे. गेल्या महिन्यामध्ये मुंबईत जो पाऊस पडला या पावसामुळे आमची बहुतांश पुस्तक भिजून खराब झालीत. तसंच कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आमचा हा व्यवसाय बंद असल्यामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलेला आहे. लोकल सुरू नसल्यामुळे वाचक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे इतर गोष्टी ज्या पद्धतीने सुरळीत होत आहेत. त्या पद्धतीनेच लोकांना बाहेर पडण्याची मुभा देऊन आमच्या व्यवसायाला मदत करावी. तसेच या परिसरात पुस्तक विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे, असं पुस्तक विक्रेते निलेश त्रिवेदी यांनी म्हटलं.