Cyclone tauktae | मुंबईप्रमाणे ठाणे शहरालाही तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका
आज अरबी समुद्रात आलेलं तोक्ते चक्रीवादळाचा मुंबईप्रमाणे ठाणे शहराला देखील मोठा फटका बसला आहे.अनेक ठिकाणी झाडं पडल्याने घरांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
ठाणे : तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाण्याला देखील मोठा फटका बसला. ढगाळ वातावरणात संततधार कोसळणाऱ्या पावसासह घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे ठाण्यातील विविध भागात झाडे उन्मळून घरांचे व वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडीत झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वादळी पाऊस आणि वृक्षांच्या पडझडीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आली होती आणि झालेही तसेच. सोमवारी सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. ठाणे शहरात देखील दिवस भरात अंदाजे 200 मिलिमीटर इतका पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या.
ठाण्यात वादळाच्या तडाख्यात लक्ष्मी बिल्डिंगच भाग पडला. तर फातिमा बिल्डिंगचा स्लॅब चाळीवर पडला असल्याची घटना नगर मुंब्रा येथे घडली. ठाण्यात झाडे पडल्याच्या आपत्ती व्यवथापनाकडे तब्बल 95 तक्रारी आल्याची माहिती आपत्ती व्यवथापन कक्षाने दिली. यात ऋतुपार्क, राबोडी पोलीस ठाण्याच्या जवळ, राजवी प्लाझा लक्ष्मी वाडी, चेंदणी कोळीवाडा, वाले इस्टेट रॉड नं 22, न्यू इंडिया बांदक नितीन कंपनी,वागले इस्टेट संकल्प सर्कल, रहेजा गार्डन, अटलांटिक सोसायटी, कशिशपार्क एलबीएस रोड ठाणे पश्चिम, कळवा प्रभाग समिती कळवा, खिडकाळी गाव, गावदेवी मंदिर शीळ डायघर, ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात समोर, शिवम हॉटेल, ठाणे, कोपरी पूर्व, कासारवडवली हावरे सोसायटी, टोकियो बिल्डिंग, खोठरी कंपाउंड मानपाडा ठाणे (प), कळवा नका शिवाजी महाराज स्टॅच्यू जवळ, वीर बजरंग जिम गोकुळ नगर, ठाणे पश्चिम, अशा विविध ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी पार्किंग केलेल्या गाड्यांवर झाडांच्या फांद्या पडून गाड्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या.
ठाण्यातील फायर ब्रिगेड व आपत्कालीन कक्षाच्या जवानांना नौपाडयातील रहिवाश्यांचा सलाम
नौपाडा पोलिस स्टेशन समोरील रस्त्यावर एका होंडासिटी गाडीवर भलं मोठं झाड पडलं. आतमध्ये स्वतः गोडबोले हॉस्पिटलमध्ये जाणारे डॉक्टर रितेश गायकवाड होते. परंतु, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात फायर ब्रिगेड व आपत्कालीन कक्षाच्या टीमला यश मिळालं.