'लालबागचा राजा'च्या मिरवणुकीत मोबाईल, पाकिटं चोरणारे अटकेत
चोरांची ही टोळी मुंबईची नसून गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरी करण्याच्या उद्देशाने हे सर्वजण दिल्लीहून मुंबईला आले होते.
मुंबई : गणपती विसर्जन (23 सप्टेंबर) मिरवणुकीत चोरट्यांनी भाविकांच्या मोबाईल, पाकिटांवर हात साफ केला होता. पाच जणांच्या टोळीने भक्तांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला असल्याचं उघड झालं आहेत. या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हरिश कुमार सिंह आणि सोनू शर्मा अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत, तर तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शेकडो लोकांची मोबाईल, पाकिटं, दागिने लांबवल्याचं अटक केलेल्या दोघांनी कबूल केलं आहे.
मुंबई पोलिसांनी या चोरट्यांकडून 21 मोबाईल जप्त केले आहेत, ज्याची किंमत जवळपास पाच लाख रुपये आहे. विशेष म्हणजे चोरांची ही टोळी मुंबईची नाही. गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरी करण्याच्या उद्देशाने हे सर्वजण दिल्लीहून मुंबईला आले होते आणि एका हॉटेलमध्ये थांबले होते. गणपती विसर्जन मिरवणुकीत मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते हे त्यांनी टीव्हीवर पाहिलं होतं.
गणपती विसर्जनाच्या दिवशी लालबाग-परळ परिसरात जवळपास 162 जणांनी चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी बंदोबस्तादरम्यान या आरोपींनी अटक केली.